मराठवाड्यात मराठा-कुणबी जातप्रमाणपत्रांचे वाटप  Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

मराठवाडयात १ लाख ४७ हजार मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप

बीड जिल्ह्यात सर्वाधिक जात प्रमाणपत्रांचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजाला राज्य सरकारने स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले आहे, तरीही आजच्या घडीला शिक्षणासाठी लाखो रुपये मोजावे लागत आहेत. ही एकप्रकारे सरकारकडून धूळफेक असल्याचा दावा मराठा समाजातून केला जात आहे. उच्च शिक्षणासाठी वर्षाकाठी किमान दोन ते पाच लाख रुपये मोजावे लागत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जीवनयात्रा संपविण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, आतापर्यंत मराठवाड्यात १ लाख ४७ हजार १६८ जातप्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असून यात सर्वाधिक जात प्रमाणपत्रांचे बीड जिल्ह्यात करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त जगदीश मिनीयार यांनी दिली.

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत १३ जणांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. त्यामध्ये एकट्या छत्रपती संभाजीनगरातील १२ जणांचा समावेश आहे तर जालन्यातील एकाचा समावेश आहे. आरक्षणासाठी आपली जीवनयात्रा संपविलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाखांची मदत शासनाकडून दिली जात आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजाला राज्य शासनाने स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले आहे. आरक्षण देण्यात आले असले तरी, त्याचा शिक्षणासाठी कोणताही फायदा होत नसल्याचे मत मराठा समाजाने व्यक्त केले आहे. तर सरकारने आरक्षण दिल्याचा फायदा घ्यावा, या आरक्षणाचे फायदे समजून घ्यावेत, असेही मत व्यक्त होत आहे. दरम्यान, २७ जून रोजी लाडसावंगीतील बाबासाहेब जनार्दन पडूळ यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. त्यामुळे मुलाच्या शिक्षणासाठी पैसे मोजावे लागत असल्याची चिठ्ठी लिहून आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ओबीसीप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळाल्या आहेत. आता आपली जीवनयात्रा संपवू नका, आरक्षणाचे मुद्दे समजून घ्या, असे मराठा क्रांती मोर्चातील समन्वयकांचे म्हणणे आहे. तर जातप्रमाणपत्रासाठी केवळ ५७ रुपये द्यावे लागत असल्याचे सेतू सुविधा केंद्राचे म्हणणे आहे.

आजपर्यंत वाटप झालेले जात प्रमाणपत्र

जिल्हा व प्रमाणपत्र संख्या

  • संभाजीनगर : ११ हजार ४३३

  • जालना : १० हजार २१०

  • परभणी ९ हजार ४९९

  • हिंगोली ५ हजार ३८१

  • नांदेड २ हजार ९१५

  • बीड ९६ हजार १३७

  • लातूर १ हजार ७६६

  • धाराशिव ९ हजार ८२७

एकूण १ लाख ४७ हजार १६८

आरक्षणाचे फायदे समजून घ्यावे समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाले आहे. ओबीसी प्रमाणे सवलती मिळाल्या आहेत. त्यामुळे आत्महत्या करण्याचे काहीही कारण नाही. ज्यांना समजत नसेल त्यांनी आधी ते समजून घ्यावे. जे मिळाले आहे त्यात धन्यता मानावी.
किशोर चव्हाण, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा
सरकारकडून धूळफेक मराठा-कुणबी समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे, तरीही उच्च शिक्षणासाठी वर्षासाठी किमान दोन ते पाच लाख मोजावे लागत आहेत. या आरक्षणाचा शिक्षणासाठी फायदा होत नाही. सरकारकडून धूळफेक केली जात आहे.
सुभाष पांडभरे पाटील, शहर सरचिटणीस, काँग्रेस
५७ रुपयात जातप्रमाणपत्र मराठा-कुणबी जातप्रमाणपत्रासाठी १९६७ चा खासरापत्राचा पुरावा, तसेच महसूली नोंदीचे पुरावे हवे. याशिवाय शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, रहिवासी असल्याचा पुरावा अशी कागदपत्रे द्यावी लागतात. जातप्रमाणपत्रासाठी ५७ रुपये लागतात.
गणेश निकम, सेतू सुविधा केंद्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT