Discontent has spread within the BJP after tickets were denied to many aspiring candidates.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आचारसंहिता जाहीर होताच प्रत्येक प्रभागातील सर्वच इच्छुकांना कामाला लागा, असे आदेश देत सर्वांना सोबत फिरण्याचे आदेश दिले. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या ही सुमारे १५ ते २० च्या घरात होती. दोन आठवडे प्रभागातील गल्ल्या पिंजून काढल्यानंतर प्रत्येकाच्या मनात मीच नगरसेवक होणार, असा आत्मविश्वास झाला अन् ऐनवेळी यातील बहुतांश जणांचे तिकीट कापल्या गेले. काही ठिकाणी तर दुसऱ्यांनाच उमेदवारी देण्यात आली. कामाला लावून तिकीट कापल्याने भाजपमध्ये हा उद्रेक झाला. सोबत फिरण्याचा शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांचा फार्म्युलाच पक्षासाठी डोकेदुखी ठरला आहे.
महापालिकेत यंदा भाजपचाच महापौर बसवायचा, असा नारा नेत्यांनी लगावला. त्यानंतर शहराध्यक्ष शितोळे यांनी आचारसंहिता लागताच सर्व इच्छुकांच्या बैठका घेतल्या. यात प्रत्येकाला कामाला लागण्याची सूचना त्यांनी केली.
सर्वांनी एकत्रितरीत्या सोबत डोअर टू डोअर फिरून केंद्र आणि राज्य सरकारने काय कामे केली, याची माहिती मतदारांना देण्यासंदर्भातही त्यांनी सांगितले.
मात्र या बैठकीनंतरही काही इच्छुकांनी स्वतंत्रपणेच पक्षाऐवजी स्वतःचाच प्रचार करणे सुरू केले. याबाबत एकत्रित फिरणाऱ्या इच्छुकांनी शितोळे यांना माहिती दिली. त्यामुळे पुन्हा प्रभागाप्रभागांमध्ये बैठका घेत त्यांनी सर्व इच्छुकांना सोबत फिरून कमळाचाच प्रचार करावा, असे स्पष्ट केले.
दरम्यान, जो कोणी वैयक्तिक प्रचार करेल, त्याला उमेदवारी मिळणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळेच प्रत्येक प्रभागात भाजपच्या सर्वच इच्छुकांनी एकत्रित फिरून पक्षाचा प्रचार केला. शितोळे यांच्या या फार्म्युल्यामुळे भाजप घराघरांत तर पोहचला, पंरतु यामुळे प्रत्येक इच्छुकाच्या मनात आपल्यालाच उमेदवारी मिळणार, अशी भावना निर्माण झाली. त्यानंतर ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने या इच्छुकांचा उद्रेक उफाळून आल्याचे नाराजांमधून ऐकावयास मिळाले. त्यामुळे शितोळे यांचा हा फार्म्युलाच आता सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
काम करा म्हणाले अन... भाजपचे १८ ते २० वर्षे काम केले. 66 विविध आंदोलनाचे १० हून अधिक गुन्हे आजही दाखल आहेत. पक्षाकडून मला कामाला लागण्याच्या सूचना केल्या. तरीही पक्षाने मला डावलून नव्याने आलेल्यांना उमेदवारी दिली. माझे काय चुकले. आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या का?- दिव्या मराठे, नाराज इच्छुक, भाजप
फॉर्मसाठी झुलवत ठेवले पंचवीस वर्षे भाजपचा कार्यकर्ता 66 म्हणून काम केले. सतत पक्ष बळकटीसाठी प्रयत्न केले. अखेरपर्यंत तुला उमेदवारी देणार, असे सांगितले. तुझ्यासाठीच युती तोडल्याचेही म्हणाले अन् उमेदवारी भरल्यानंतर शेवटपर्यंत बी फॉर्मसाठी झुलवत ठेवले. त्यामुळेच संताप वाढला.- प्रशांत भदाणे पाटील, नाराज इच्छुक, भाजप
नोकरी सोडायला लावली महापालिका निवडणुकीसाठी कामाला लाग, उमेदवारी देणार असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले होते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वीच बँकेची नोकरी सोडून कामाला लागलो अन् ऐनवेळी पक्षाच्या याच नेत्यांनी माझे तिकीट कापून पक्षात नव्याने आलेल्या गुन्हेगाराला उमेदवारी दिल्याने संताप वाढला.श्रीअण्णा भंडारी, नाराज, भाजप
उमेदवारी देतो का म्हणाले? भाजपचे तब्बल २० वर्षे काम केले. प्रत्येक आंदोलनात सहभाग नोंदविला. त्यामुळे यंदा तुम्हाला उमेदवारी देणार, असे आश्वासन प्रत्येकाने दिले. परंतु ऐनवेळा उमेदवारी नाकारली. त्यामुळेच नाराजी व्यक्त केली. -संध्या कापसे