छत्रपती संभाजीनगर : देवगिरी किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आम्ही शक्य ती सर्व मदत करू. पुरातत्व विभागाने फक्त लोकाभिमुख व्हावे, अशी अपेक्षा इंटॅकच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात १० सूचनांचे निवेदन भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अधीक्षकांना देण्यात आले.
देवगिरीवर लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर इतिहासप्रेमींच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि.१६) पुरातत्व अधीक्षक डॉ. शिवकुमार भगत यांची भेट घेऊन त्यांना आपल्या सूचना आणि मागण्यांचे निवेदन दिले. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (इंटॅक) च्या छत्रपती संभाजीनगर चॅप्टरच्या समन्वयक आर्किटेक्ट माया वैद्य, सहसमन्वयक ॲड. स्वप्नील जोशी यांच्यासह इतर सदस्य आणि इतिहासप्रेमी यावेळी उपस्थित होते. यामध्ये श्याम देशपांडे, संतोष बक्षी, डॉ. दिगंबर माके, संकेत कुलकर्णी, आदित्य वाघमारे, अमित देशपांडे, बागेश्री देसाई, डॉ. संजय पाईकराव आदींचा समावेश होता. यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी संजय रोहणकर हेही उपस्थित होते. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर केलेल्या कामाची आणि पुढील उपाययोजनांची माहिती दिली.
१. वास्तू अवशेष आणि तटबंदीवर उगवलेले गवत व झाडे वेळोवेळी काढून टाकणे आवश्यक आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या अगोदर गवत, सुकलेल्या फांद्या आणि प्लास्टिक कचरा काढण्यासाठी नियमित स्वच्छता मोहिमा राबवाव्यात. तसेच बालेकिल्ल्यावर जाळरेषा काढल्या जाव्यात.
२. किल्ल्यावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रवेशद्वारावर कसून तपासणी करावी. जेणेकरून कोणीही सिगारेट, लायटर, बीडी, माचिस किंवा इतर ज्वलनशील वस्तू आत घेऊन जाऊ शकणार नाही.
३. प्लास्टिक बाटल्यांचे ढिगारे हे मोठे संकट आहेत. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्यांवर स्टिकर्स लावण्याची आणि २० रुपयांचे डिपॉझिट घेण्याची पूर्वीची पद्धत पुन्हा सुरू करावी.
४. महाराष्ट्र अग्निसुरक्षा आणि जीवनरक्षक उपाय योजना अधिनियम, २००६ नुसार आवश्यक ती कार्यवाही करावी. त्यामध्ये अग्निशमन यंत्रणा, वाळू, माती व पाणी अशा वस्तू ठळक ठिकाणी ठेवल्या जाव्यात.
५. आपत्कालीन प्रसंगी किल्ल्यातील कोणत्याही भागात छोटे पाण्याचे टँकर किंवा अग्निशमन यंत्रणा पोहोचू शकतील, यासाठी वाटा तयार करून त्यांची नियमित देखभाल करावी.
६. किल्ल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे अनेक वर्षांपासून बंद असून ते सुरू करण्यात यावेत, तसेच प्रगत अलार्म प्रणाली बसवाव्यात, जेणेकरून आपत्कालीन प्रसंगी वेळीच इशारा मिळेल आणि कारवाई करता येईल.
७. आपत्कालीन प्रसंगी कृती करू शकतील, अशा प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी. कर्मचाऱ्यांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण द्यावे.
८. पुरातत्व विभागाने आपल्या कामाबद्दल लोकाभिमुख व्हावे आणि जतन व संवर्धन कामाची, उपक्रमांची माहिती नागरिकांना होईल, असे पहावे. यामध्ये गरज असल्यास स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घ्यावे.
९. आगीमुळे नुकसान झालेल्या वास्तू आणि अवशेषांचे संवर्धन तातडीने सुरू करावे.
१०. प्राचीन स्मारके, पुरातत्त्व स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९५६ च्या कलम २० (ई) नुसार वारसा उपनियम (Heritage Bye-Laws) तयार करून अंमलात आणावेत.