Demand for gilke, aloo leaves increases in Pitru Paksha
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पितृपक्षाला सुरुवात होताच धार्मिक विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट पालेभाज्या आणि भाज्यांना बाजारात मागणी वाढली आहे. गिलके, अळूची पाने, चुका, मेथी, लाल भोपळा आणि चाकी (चक्की) यांची रविवारी (दि. २७) औरंगपुरा, शहागंजसह शहरातील विविध किरकोळ भाजीमंडईत चांगली विक्री झाली. मागणी वाढली असली तरी आवक समाधानकारक असल्याने बहुतांश भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र, काही भाज्यांच्या दरात वाढ झाली असून अद्रक आणि लसणाचे भाव चांगलेच चढले आहेत.
पितृपक्षातील धार्मिक विर्धीसाठी आवश्यक असलेल्या भाज्यांना दरवर्षी या काळात विशेष मागणी असते. यंदाही गिलके आणि अळूची पाने १५ रुपये जुडी, तर चुका, मेथी आणि लाल भोपळा ४० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तर चाकी (चक्की) चा दर १०० रुपये किलो आहे. यासह पितृपक्षासाठी आवश्यक पालेभाज्यांची मागणी वाढली असून, त्याचवेळी बाजारात आवकही चांगली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
रम्यान, रविवारी बाजारात बटाट्याचा दर २५ ते ३० रुपये, कांदा ६० रुपये किलो होता. भोपळा ४०, टोमॅटो ३० ते ४०, वांगे ४०, भेंडी ४०, गाजर ६०, कारले ६०, कोबी ६०, हिरवी मिरची ६० आणि सिमला मिरची ६० रुपये किलो दराने विकली जात आहे. वाल व गिलके ८०, दिलपसंद ८०, शेवगा १०० आणि श्रावण घेवडा ६० रुपये किलो आहे. तर पालेभाज्यांमध्ये मेथी २० रुपये जुडी, पालक, चुका आणि शेपू १५ रुपये, तर कोथिंबीर १० रुपये जुडी दराने उपलब्ध आहे.
दोडका ८० रुपयांवर
काही भाज्यांच्या दरात मागील तुलनेत वाढ झाली आहे. काकडीचा दर ४० वरून ५० रुपये, तर दोडक्याचा दर ६० वरून ८० रुपये किलो झाला आहे. लिंबाचा दर २४० रुपये किलो आहे. आवक कमी असल्याने अद्रक १५० ते २४०, तर लसूण २५० ते ४०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. कंटुले २०० ते २४० रुपये किलो आहेत.