एअरव्हॉल्व्हच्या वेल्डिंगमध्ये बिघाड, पाणीपुरवठ्याच्या चाचणीत विलंब file photo
छत्रपती संभाजीनगर

Water pipeline leak : एअरव्हॉल्व्हच्या वेल्डिंगमध्ये बिघाड, पाणीपुरवठ्याच्या चाचणीत विलंब

मुख्य जलवाहिनीतील गळतीमुळे दुरुस्ती सुरू. आज दुपारनंतरच पुढे सोडणार पाणी

पुढारी वृत्तसेवा

Defect in Air Valve Welding; Delay in Water Supply Testing

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या चाचणीदरम्यान मुख्य जलवाहिनीमध्ये गळती आढळून आल्याने पाणीपुरवठ्याचे काम तात्पुरते थांबवावे लागले आहे. एअरव्हॉल्व्ह बसविण्यासाठी करण्यात आलेल्या जोडणी-वरील वेल्डिंग सुटल्याने पाइपलाइनमधून पाणी बाहेर पडत आहे. दुरुस्तीचे काम सुरू असले तरी जलवाहिनीत पाणी शिल्लक असल्याने आतील वेल्डिंग रखडले असून आज सोमवारी (दि. १८) दुपारनंतरच पाणी पुढील टप्प्याकडे सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नवीन योजनेअंतर्गत जॅकवेलमधून मुख्य जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आणण्याची प्रक्रिया सुरू होती. यानंतर पाइपलाइन स्वच्छतेचे काम सुरू असताना बिडकीन परिसरातील साई मंदिराजवळ अचानक गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आले.

सुरुवातीला सामान्य तांत्रिक दोष असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र तपासणीनंतर एअरव्हॉल्व्हसाठी तयार करण्यात आलेल्या होलवरील वेल्डिंग तुटल्याचे स्पष्ट झाले. यावेळी गळती वाढत असल्याचे लक्षात येताच संबंधित विभागाने तातडीने पाणीपुरवठा बंद करून जलवाहिनी रिकामी करण्याचे काम हाती घेतले.

तसेच रविवारी (दि.१६) बाहेरील बाजूने दुरुस्ती करण्यात आली. मात्र पाइपलाइनमध्ये पाणी असल्याने आतील भागातील वेल्डिंग पूर्ण करता आले नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी अंतिम दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच जलवाहिनी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यादुरुस्तीबरोबरच जलवाहिनीतील गाळ आणि अशुद्धता दूर करण्यासाठी स्वच्छता मोहीम सुरू आहे.

अजित सिड्स परिसर तसेच निसर्ग नर्सरीजवळील स्कॉर व्हॉल्व्हमधून पाणी सोडून पाइपलाइन साफ करण्यात येत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचवले जाणार आहे. दरम्यान शहरात १२ जूनपासून नवीन योजनेद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनीकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. अंतिम चाचण्या सुरू असतानाच निर्माण झालेल्या या तांत्रिक अडचणीमुळे कामात काहीसा विलंब झाला आहे.

दुपारनंतरच पुढील भागात पाणी

आतील वेल्डिंग आणि तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतरच सोमवारी सकाळी जलवाहिनी पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारनंतर पुढील भागाकडे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होईल. या कामामुळे नियोजित वेळेपेक्षा पाणीपुरवठा उशिराने होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT