Dangerous Building: Century-old dilapidated building in Gulmandi demolished
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्यात जीर्ण इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये यासाठी महापालिकेने धोकादायक बांधकामांविरोधातील कारवाईला गती दिली आहे. या मोहिमेअंतर्गत गुरुवारी (दि.६) पथकाने गुलमंडी परिसरातील सुपारी हनुमान मंदिरासमोरील सुमारे ९० ते १०० वर्षे जुनी जीर्ण झालेली दुमजली इमारत व सिटी चौक भागातील फुलबाजार गल्लीतील दोन दुकानांसह अन्य दोन ठिकाणांच्या इमारती जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. त्यानंतर उत्तम मिठाई भांडाराशेजारील दुसऱ्या धोकादायक इमारतीचा काही भाग पाडण्यात आला. कारवाईसाठी गेलेल्या पथकाला संबंधित मालकाने नोटीस मिळालेली नसल्याचा दावा केल्याने ती कारवाई तूर्तास स्थगित ठेवण्यात आली.
महापालिकेने शहरातील ४१ हून अधिक जीर्ण व धोकादायक इमारतींची यादी तयार केली आहे. संबंधित मालकांना नोटीस बजावण्यात आल्या असल्या तरी अनेक ठिकाणी मालक-भाडेकरू वाद, मालकी हक्काचे प्रश्न आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे प्रत्यक्ष कारवाईला अडथळे निर्माण होत आहेत. मात्र संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने टप्प्याटप्प्याने धोकादायक इमारती हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेचा भाग म्हणून अतिक्रमण नियंत्रण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी गुलमंडी परिसरात कारवाई करण्यात आली. कन्नूलाल बाबुलाल यांच्या मालकीची ही दुमजली इमारत विक्री झालेली असली तरी ती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने अनेक दिवसांपासून रिकामी होती. समोरील व्यावसायिक आस्थापने सुरू असतानाच आवश्यक संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली. तर उत्तम मिठाईशेजारील विजया पातुरकर व नितीन पातुरकर यांच्या मालकीची इमारत धोकादायक अवस्थेत उभी असल्याने त्याचा काही भाग पाडण्यात आला.
मात्र नोटीस न मिळाल्याचा दावा केल्याने ती कारवाई तुर्तास स्थगित करण्यात आली. भागातील फुलबाजार गल्लीकडे वळवला. या गल्लीतील गुलबहार फुल सेंटरमधील फुलाचे व सुटकेस विक्रीचे एक अशी दोन दुकाने निष्कासित केली. जब्बार हुसेन फिदा अली कमरुद्दीन आणि भाडेकरू अमदतुला हाजी इनायतउल्ला यांची ही दुकाने जीर्ण झाली होती. नोटीस बजावूनही हटवण्यात न कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, झोन क्रमांक एकच्या सहायक आयुक्त लता पुजारी, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, महापालिकेचे कर्मचारी तसेच नागरी मित्र पथक
दोन दिवसांत सात इमारतींवर कारवाई
शहरातील धोकादायक इमारती हटविण्याच्या मोहिमेला महापालिकेकडून बुधवारी (दि.५) सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी सिटी चौक परिसरातील अत्तर गल्लीतील दोन जीर्ण इमारती निष्कासित करण्यात आल्या. त्यानंतर गुरुवारी गुलमंडीसह फुलबाजार गल्लीतील दोन दुकानांवरील कारवाई पार पडली. उर्वरित धोकादायक इमारतींवरही टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
४१ हून अधिक इमारती धोकादायक
महापालिकेने शहरातील ४१ हून अधिक इमारती धोकादायक घोषित करून संबंधित मालकांना नोटीस बजावल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन वाद, मालकी हक्काचे प्रश्न आणि भाडेकरूंच्या वादामुळे कारवाईला विलंब होत असला तरी पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.