Sambhajinagar News : दिघीत दामिनी पथकाची कारवाई; अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : दिघीत दामिनी पथकाची कारवाई; अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला

वाळूज पोलिसांच्या दामिनी पथकाने तत्परता दाखवत गंगापूर तालुक्यातील दिघी येथे होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश मिळविले.

पुढारी वृत्तसेवा

Damini squad's action in Dighit; Marriage of a minor girl prevented

वाळूज, पुढारी वृत्तसेवा : वाळूज पोलिसांच्या दामिनी पथकाने तत्परता दाखवत गंगापूर तालुक्यातील दिघी येथे होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश मिळविले. ही कारवाई रविवारी (दि. ५) करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे दिघी येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची खबर दामिनी पथकाला मिळाली. त्यानुसार वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गोरे, पोलिस अंमलदार राजपूत, त्रिभुवन तसेच दामिनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार निर्मला निंभोरे, कल्पना नागरे, नारायण केरूळकर आणि दिघीचे ग्रामविकास अधिकारी काळवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तेथे विवाहासाठी मंडप उभारण्यात आला होता आणि स्वयंपाकाची तयारीही सुरू होती. पथकाने तातडीने हस्तक्षेप करून विवाहाची प्रक्रिया थांबविली. त्या वेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. पथकाने उपस्थित नागरिक, वधू-वर पक्ष आणि नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६ अंतर्गत असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देत बालविवाहाचे सामाजिक व कायदेशीर दुष्परिणाम समजावून सांगितले यावेळी ग्रामविकास अधिकारी काळवणे यांनीही ग्रामस्थांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देत अशा प्रथांना आळा घालण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली. पोलिसांनी उपस्थित महिला, नागरिक आणि वराडी मंडळींचे समुपदेशनही केले.

जनजागृतीची गरज

ग्रामीण भागात सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक कारणांमुळे काही ठिकाणी अद्यापही अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा विवाहांमुळे मुलींच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि भविष्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी कायद्याचे पालन करून मुलींना शिक्षणाची संधी द्यावी आणि बालविवाह रोखण्यासाठी समाजानेही पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT