बालविवाह रोखल्यानंतर मुलीचे आणि तिच्या कुटुंबीयांचे दामिनी पथकाने समुपदेशन केले. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Child marriage prevention : गरिबी, असुरक्षिततेच्या धास्तीने अल्पवयीन मुलीचे हात पिवळे करण्याची धडपड

मुंबईत मुलगी एकटी सोडावी कशी? धुणी-भांडी करणाऱ्या माऊलीचा टाहो

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एककीडे लेक वाचवा, लेक शिकवाचा नारा दिला जात असताना, दुसरीकडे गरिबी आणि असुरक्षिततेच्या धास्तीपोटी एका आईला आपल्या पोटच्या गोळ्याला अल्पवयीन असतानाच सासरी धाडण्याची वेळ आली. मुंबईहून छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्नासाठी आणलेल्या एका १७ वर्षीय मुलीचा विवाह गुरुवारी (दि.१२) दामिनी पथकाने रोखला. नवरीच्या वेशात नटलेल्या त्या मुलीच्या डोळ्यांत भविष्यातील स्वप्नांऐवजी गरिबीची भीती अधिक स्पष्टपणे जाणवत होती.

अधिक माहितीनुसार, ही मुलगी मुंबईत दहावीत शिक्षण घेत आहे. तिची आई मुंबईसारख्या महानगरात लोकांच्या घरी धुणी-भांडी करून संसाराचा गाडा ओढते. घरात पुरुषी आधार नाही, हातावरचे पोट आणि त्यात तरुण होत चाललेली मुलगी... या विवंचनेत असलेल्या आईला मुलीचे शिक्षण पूर्ण करण्याऐवजी तिचे हात पिवळे करणे सुरक्षित वाटले.

मुंबईत मुलीला एकटीला सोडून कामावर कसं जायचं? घराबाहेरचं वातावरण चांगलं नाही, आमची परिस्थिती हलाखीची आहे, असा टाहो त्या माऊलीने फोडला तेव्हा उपस्थित पोलिस आणि नागरिकांचेही डोळे पाणावले. केवळ आर्थिक चणचण आणि सुरक्षेचा प्रश्न म्हणून एका शिकणाऱ्या मुलीला संसाराच्या दावणीला बांधले जात होते. दामिनी पथकाने त्या मुलीच्या आईला आणि नातेवाईकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत समज दिली.

लग्नाचे स्टेज सजले अन पोलिस धडकले

बीड बायपासवरील शुभम लॉन्सवर लग्नाची जय्यत तयारी झाली होती. स्वयंपाक तयार होता, आहेराची भांडी मांडलेली होती आणि नवरीच्या वेशात ही मुलगी आपल्या आयुष्यातील नव्या वळणाची वाट पाहत होती. मात्र, वय अवघे १७ वर्षे ६ महिने. कायद्याच्या चौकटीत हे लग्न बसत नव्हते. दामिनी पथकाच्या प्रमुख कांचन मिरधे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे, कविता गवळी, मोनिका दिवे, सुनीता नागलोद, आम्रपाली बोर्डे (महिला व बालविकास समिती), सचिन चव्हाण आणि सुनील पवार यांनी तिथे पोहोचून हा विवाह रोखला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT