Damage assessments completed for 5.3 million hectares in Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृतसेवा : मराठवाड्यात मागील चार वर्षे अतिवृष्टीमुळे यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यात गेल्या महिन्यात ४९ लाख ५३ हजार ७६५ शेतकऱ्यांच्या ५३ लाख ४७ हजार ८०४.०५ हेक्टरवरील खरिपाचे नुकसान झाले आहे. या संपूर्ण पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे. एवढेच नव्हे तर केंद्राचे एनडीआरएफचे पथकही पाहणी करून गेले आहेत. त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष प्रत्यक्ष मदतीकडे लागले आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पेरणी करता यावी, यासाठी शासनाने अग्रिम ५ हजार रुपये वितरितही केले आहेत.
मराठवाड्यात शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी तर कधी कमी पर्जन्यमानामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा विभागात अल निनोमुळे पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिले. त्याचा फटका विभागातील तब्बल ४९ लाख ५३ हजार ७६५ शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. यंदा विभागात ५३ लाख ४७ हजार ८०३.८ हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष खरीप पिकाची पेरणी झाली होती.
यात बहुतांश पिकाचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान सोयाबीन, कपाशीचे झाले आहे. ४ ते ५ वर्षांपासून महत्त्वाचा खरीप हंगाम अतिवृष्टी आणि कमी पर्जन्यमानामुळे शेतकऱ्याच्या हातून जात असल्याने विभागातील शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे.
त्यात शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याना शासनाकडून मदत जाहीर होऊन ती खात्यात जमा होईपर्यंत किमान दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने ५ हजार रुपये अग्रिम देण्याचा निर्णय घेत वाटपही केला. विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिमचे ५ हजार रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे आता एनडीआरएफच्या निकषानुसार केव्हा मदत जाहीर होणार आणि ती खात्यात केव्हा येणार याकडे बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.