Sambhajinagar News : चिकलठाण्यात ड्रेनेजच्या पाण्यावर पालेभाज्यांची शेती file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : चिकलठाण्यात ड्रेनेजच्या पाण्यावर पालेभाज्यांची शेती

महापालिकेकडून मोटारी, पाइपसह विद्युत साहित्य जप्त

पुढारी वृत्तसेवा

Cultivation of leafy vegetables using drainage water in Chikalthana

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भूमिगत गटार योजनेच्या चेंबरमधून मोटारी आणि पाइपच्या साहाय्याने सांडपाणी उपसून त्याचा वापर शेतीसाठी करण्याचा प्रकार चिकलठाणा परिसरात उघडकीस आला आहे. ड्रेनेजच्या पाण्यावर पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर महापालिकेच्या पथकाने बुधवारी (दि.२२) सायंकाळी अचानक तपासणी करीत मोटारी, पाइप आणि विद्युत साहित्य जप्त केले.

हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःहून मोटारी काढून घ्याव्यात, असे आवाहन शहर अभियंता संजय कोंबडे यांनी केले आहे. यापुढे सांडपाणी चोरून वापरताना कोणी आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चिकलठाणा, नारेगाव, सिडको-हडको या भागांतील सांडपाणी भूमिगत गटार योजनेद्वारे झाल्टा येथील मलजल प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन ३४ एमएलडी असताना दोन दिवसांपूर्वी तेथे अवघे चार ते पाच एमएलडी पाणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उर्वरित सांडपाणी नेमके कुठे अडविले जात आहे किंवा त्याचा अपहार होत आहे का, याचा शोध घेण्याचे आदेश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिले होते

या आदेशानुसार बुधवारी सायंकाळी महापालिकेच्या विशेष पथकाने चिकलठाणा रिसरातील ड्रेनेज चेंबरची तपासणी केली. या वेळी एका चेंबरमध्ये आठ ते दहा पाइप टाकून सांडपाणी उपसले जात असल्याचे आढळले. त्यासाठी मोठ्या चेंबरमधून अशा प्रकारे पाणी उपसले जात असल्याचे पाहून महापालिका कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. पथकाने तातडीने कारवाई करीत संबंधित मोटारी, पाइप आणि विद्युत साहित्य जप्त करण्यात आले. तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत ड्रेनेजमधून पाणी चोरून उपसल्याचे आढळल्यास संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील.

तपासणी मोहीम तीव्र करणार

चिकलठाणा, नारेगाव, सिडको-हडको या भागांतील सांडपाणी भूमिगत गटार योजनेद्वारे झाल्टा येथील प्रक्रिया प्रकल्पापर्यंत अपेक्षित प्रमाणात सांडपाणी पोहोचावे आणि त्याचा अनधिकृत वापर रोखला जावा, यासाठी महापालिकेने आता तपासणी मोहीम तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

नागरिकांच्या आरोग्याला धोका

ड्रेनेजच्या सांडपाण्यावर परिसरातील शेतकरी पालेभाज्यांचे उत्पादन घेत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा पाण्याचा शेतीसाठी वापर करणे धोकादायक असल्याचे शहर अभियंता संजय कोंबडे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी स्वतःहून मोटारी काढून घेऊन सांडपाण्याचा वापर तातडीने बंद करावा, असे आवाहनही कोंबडे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT