मनपाच्या जीर्ण शाळांना सीएसआरचा आधार, चार नव्या इमारतींचे नियोजन file photo
छत्रपती संभाजीनगर

Municipal School : मनपाच्या जीर्ण शाळांना सीएसआरचा आधार, चार नव्या इमारतींचे नियोजन

ब्रिजवाडी, विटखेडा, कांचनवाडी, एन-११ शाळांचा समावेश : खासगी कंपन्यांसह उद्योजकांसोबत चर्चा

पुढारी वृत्तसेवा

CSR support for dilapidated Municipal Corporation schools; plans for four new buildings

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या जीर्ण आणि धोकादायक शाळांच्या इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने आता सामाजिक दायित्व निधीचा (सीएसआर) पर्याय पुढे केला आहे. मिटमिटा येथील महापालिका शाळेची इमारत सीएसआरमधून उभारल्यानंतर त्याच धर्तीवर शहरातील आणखी चार शाळांच्या नवीन इमारती बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ब्रिजवाडी, विटखेडा, कांचनवाडी आणि एन-११ येथील शाळांचा त्यात समावेश असून, यासाठी एका नामाकिंत कंपनीसह शहरातील एका उद्योजकासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती उपायुक्त तथा शिक्षण विभागप्रमुख अंकुश पांढरे यांनी दिली.

महापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्या असून, त्यांची अवस्था जीर्ण आणि धोकादायक बनली आहे. गेल्या महिन्यात ब्रिजवाडी येथील शाळेत स्लॅबच्या प्लास्टरचा भाग विद्यार्थिनीच्या डोक्यावर पडून ती जखमी झाली होती. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. पालक आणि नागरिकांनीही संताप व्यक्त केला होता.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी जीर्ण इमारती असलेल्या शाळांचे ऑडिट करण्याचे आणि नवीन इमारती बांधण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले. मात्र शाळांच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याने प्रशासनाकडून सीएसआर निधीचा पर्याय तपासण्यात येत आहे.

एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सीएसआरमधून शाळा बांधून देण्याबाबत तयारी दर्शविली आहे. यापूर्वी शहरातील एका उद्योजकांनी मिटमिटा येथील महापालिका शाळेची इमारत सीएसआर निधीतून बांधून दिली आहे. याशिवाय आणखी शाळा बांधून देण्याची तयारी असल्याचे पत्रही त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे.

त्यानुसार ब्रिजवाडी, विटखेडा, कांचनवाडी आणि एन-११ येथील शाळांच्या इमारती उभारण्याबाबत संबंधितांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. यात केवळ जीर्ण इमारतींचा प्रश्नच नव्हे, तर वाढत्या विद्यार्थीसंख्येमुळे अपुऱ्या पडणाऱ्या वर्गखोल्यांची समस्याही महापालिकेसमोर आहे. यात गारखेडा, अशोकनगर, प्रियदर्शनी इंदिरानगर, नारेगाव उर्दू शाळा आणि सिल्कमिल कॉलनी उर्दू शाळा यासह अन्य शाळांमध्ये अतिरिक्त वर्गखोल्या उभारण्यासाठी सीएसआर निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

त्यामुळे धोकादायक इमारतींच्या जागी सुरक्षित पर्याय उपलब्ध करण्याबरोबरच विद्यार्थ्यांना पुरेशा वर्गखोल्या मिळवून देण्यावरही प्रशासनाचा भर आहे. दरम्यान, रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या मिटमिटा येथील महापालिका शाळेसाठी तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर शहरातील एका उद्योजकाने सीएसआर निधीतून नवीन इमारत बांधून दिली. इमारतीचे काम पूर्ण झाले असून, दिवाळीनंतर या नवीन इमारतीत शाळा भरविण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अंकुश पांढरे यांनी दिली.

काम सुरू होण्याकडे लक्ष

सीएसआरच्या माध्यमातून शाळांच्या इमारती उभारण्याचे नियोजन यशस्वी झाल्यास महापालिकेवरील बांधकाम निधीचा भार कमी होण्यास मदत होईल. मात्र, प्रस्तावित चार शाळांच्या इमारतींचे प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT