Crowds gather to see the glory of Kailash Caves
सुनील मरकड
खुलताबाद: जागतिक वारसा, भारतीय शिल्पकलेचा अनुपम नमुना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेरूळ येथील कैलास लेण्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची अक्षरशः तुडुंब गर्दी उसळली असून लेण्या बघण्यासाठी दररोज लाखो पर्यटक येथे भेट देऊन भारावून जात आहेत.
हिवाळी पर्यटन हंगाम, शाळाु कॉलेजच्या सहली आणि सुट्ट्यांचा काळ यामुळे राज्यभरातून तसेच देशभरातून हजारो पर्यटक लेण्यांचे वैभव बघण्यासाठी येत असून परिसर गजबजलेला दिसत आहे. कैलास लेणींची अप्रतिम शिल्पकला, एकाच दगडातून घडवलेले भव्य मंदिरे, रामायण महाभारतकालीन दृश्यांची सजीव कोरीवकामे आणि हजारो वर्षांचा इतिहास यांचा अनुभव घेण्यासाठी दररोज विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक तसेच परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येत आहेत. सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत लेण्यांमध्ये छायाचित्रकार, पर्यटकांची वर्दळ असते.
सुरक्षा, स्वच्छता, सुविधांवर भर
पुरातत्त्व विभाग व स्थानिक प्रशासनाने गर्दी वाढल्यामुळे सुरक्षा, स्वच्छता आणि सुविधा वाढवण्यावर विशेष भर दिला आहे. अतिरिक्त सुरक्षा रक्षक, तिकीट काउंटरवर वाढीव कर्मचारी, पार्किंग व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, मार्गदर्शक सेवा आणि ध्वनिवर्धक प्रणालींची सोय करण्यात आली आहे. परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक स्थळांना भेटी यंदाचा हंगाम हा कैलास लेणी आणि वेरूळ पर्यटनासाठी विक्रमी ठरण्याची शक्यता आहे.
पर्यटकांची वाढती रुची, शैक्षणिक सहलींचा वाढता कल आणि सोशल मीडियावरील जागतिक प्रसिद्धी यामुळे या ठिकाणी आलेल्या गर्दीत सातत्याने वाढ होत आहे. खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती मंदिर, थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ, दौलताबाद येथील देवगिरीचा किल्ला या ठिकाणीही पर्यटक मोठ्या प्रमाणत भेट देतात. येथील व्यावसायिकांना देखील या वाढत्या पर्यटकांचा मोठा लाभ होत असून उलाढाल वाढली आहे.
वेरूळ गर्दीचा फायदा स्थानिक व्यावसायिकांना वेरूळ येथे घृष्णेश्वर महादेव मंदिर तसेच जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांना पाहण्यासाठी राज्यभरातून आणि देशभरातून पर्यटकांची गर्दी होत आहे. या वाढलेल्या गर्दीचा थेट फायदा स्थानिक पर्यटन व्यवसायांना होत असून, लॉज, हॉटेल व भोजनालयांमध्ये मागणी वाढली आहे.-गणेश चौधरी, लॉज मालक
दरवर्षी पर्यटकांची ये-जा असतेच, पण यंदा मात्र कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात लोक कैलास लेणी पाहण्यासाठी वेरूळ येथे येत आहे. शालेय सहली, पर्यटकांचे ग्रुप, कुटुंबांसोबत येणारे पाहुणेः दिवसभर हॉटेल परिसर गजबजलेला असतो. त्यामुळे आमच्या हॉटेलच्या व्यवसायातही चांगली वाढ झाली आहे.अंकुश जाधव हॉटेल व्यवसाय
व्यावसायिकांना आर्थिक दिलासा
पर्यटकांची एवढी मोठी गर्दी झाल्याने परिसरातील हॉटेल व लॉज व्यावसायिक यांची चांदी होत आहे तर स्थानिक, हातावर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक दिलासा मिळत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत एवढी मोठी गर्दी प्रथमच पहायला मिळत आहे.