दिवंगत बाबा फर्जन याच्या मिटमिटा येथील बंगल्यात रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा, दागिने व विदेशी मद्याचा साठा मिळून आला. 
छत्रपती संभाजीनगर

Baba Farjan House Raid | अबब! ५ कोटींची रोकड, ८ बंदुका अन्‌ ६,३५० जिवंत काडतुसे!!

छत्रपती संभाजीनगरातील वादग्रस्त कामगार नेता बाबा फर्जनच्या बंगल्यात सापडले कोट्यवधीचे घबाड

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ९० च्या दशकात शहरात गुन्हेगारीसह राजकीय दबदबा असलेला वादग्रस्त कामगार नेता दिवंगत बाबा फर्जन याच्या मिटमिटा येथील एक एकरात विस्तारलेल्या आलिशान बंगल्यात आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. १०) पहाटे छापा टाकला. यात पोलिसांच्या हाती ५ कोटी २६ लाखांची रोकड, ४ रायफल, २ पिस्तुले, २ एअरगन, २१ धारदार शस्त्रे, ६ हजार ३५० काडतुसे, २९.४३ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि विदेशी मद्याचा साठा असे ५ कोटी ६५ लाख ५४ हजार ४३४ रुपयांचे घबाड हाती लागले.

२४ तास चाललेल्या या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या छाप्यामुळे १९९० च्या दशकात शहराच्या गुन्हेगारी आणि राजकीय वर्तुळात प्रभाव टाकणारा बाबा फर्जन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याप्रकरणी शीलाबाई बाबा फर्जन दोरडी ऊर्फ शीला साळवे हिच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिटमिटा परिसरात एका बंगल्यात शस्त्रसाठा व अनधिकृत पैशांचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने शुक्रवारी पहाटे बंगल्यात छापा टाकला. पोलिसांनी शीलाबाई दोरडीकडे शस्त्रांबाबत विचारणा केली; मात्र तिने माहिती नसल्याचे सांगितले. खोल्यांची झडती घेण्यास सुरुवातीला विरोध करण्यात आला. संबंधित खोलीची चावी सुरेश सुमेर वर्मा याच्याकडे असल्याचे सांगण्यात आले. वर्माकडून चावी घेत खाेलीचा दरवाजा उघडताच शस्त्रे, रोकड, दागिने आणि काडतुसांचा साठा उघड झाला.

छत्रपती संभाजीनगरात छापा; रोकड मोजण्यासाठी आणली ५ मशिन

९० च्या दशकात शहरात गुन्हेगारीसह राजकीय दबदबा असलेल्या बाबा फर्जन याच्या मिटमिटा येथील एक एकरमध्ये विस्तारलेल्या आलिशान बंगल्यात आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि. १०) पहाटे छापा टाकला. यात ५ कोटी ६५ लाख ५४ हजार ४३४ रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले. तपासादरम्यान २९ लाख ४३ हजार ५९८ रुपयांचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. त्यात २१.३४ लाखांचे सोन्याचे आणि ८.०९ लाखांचे चांदीचे दागिने आहेत. याशिवाय, अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि विविध कंपन्यांच्या ४५ विदेशी मद्याच्या बाटल्याही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

‘एटीएस’, मिल्ट्रीच्या पथकाची भेट

शहरातील एका घरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि जिवंत काडतुसे आढळून आल्याने दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि मिल्ट्रीच्या पथकानेही घटनास्थळाला भेट दिली. ही शस्त्रे नेमकी आली कोठून आणि त्याचा वापर कशासाठी करण्यात येत होता, केला जाणार होता, याचा तपास करण्यात येत आहे.

कोण होता बाबा फर्जन?

९० च्या दशकात बाबा फर्जन याचा गुन्हेगारीसह राजकीय दबदबा होता. कामगार युनियनच्या माध्यमातून त्याने उद्योग जगतात दहशत निर्माण केली होती. त्याच्याशिवाय इतर कोणतीही युनियन कंपन्यांमध्ये नव्हती. त्याचे शहरात अमली पदार्थ तस्करी व विक्रीत अनेकदा नाव समोर यायचे. कामगार युनियन आणि गुन्हेगारीच्या जोरावर त्याने राजकीय क्षेत्रातही शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध १९९० ची विधानसभा अपक्ष लढवली होती. यात खैरे हे निवडून आले, तर फर्जनला हार स्वीकारावी लागली.

बेडरूममध्ये ५.२६ कोटींची रोकड

बंगल्याच्या बेडरूममध्ये विविध ठिकाणी लपवलेली ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपयांची रोकड आढळली. १०, २०, ५०, १०० आणि २०० रुपयांच्या नोटा पिशव्या, खोके आणि कोठ्यांमध्ये ठेवलेले आढळले. ही रोकड मोजण्यासाठी पाच पैसे मोजण्याच्या मशिन आणण्यात आल्या होत्या. एवढी मोठी रोकड नेमकी कुठून आली, याचा तपास सुरू आहे.

आठ बंदुका जप्त

छाप्‍यात ४ रायफल, २ पिस्तुले आणि २ एअरगन जप्त करण्यात आल्या. याशिवाय, ६ हजार ३५० जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. त्यामध्ये १२ बोरची ६३२ आणि ७.६५ एमएम पिस्तुलासाठीची ३,८४० काडतुसे आहेत. प्राथमिक तपासात ४ शस्त्रांचे परवाने बाबा फर्जन याच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT