Crime News: Young Man Attacked with a Koyata Over Rickshaw Purchase Deal
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रिक्षा खरेदीचा रद्द झालेला व्यवहार आणि त्यातील उरलेले पैसे परत देण्याच्या वादातून अकेफ पठाण इरफान पठाण (२२, रा. रहेमानिया कॉलनी) या तरुणावर कोयत्याने सपासप वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. २८) रात्री ९ वाजेच्या सुमारास नारेगाव परिसरातील कुरेशी पार्क येथे घडली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी आरोपी साजीद बिबन मणियार (रा. कुरेशी पार्क, नारेगाव) याला अटक केली असून, शनिवारी (दि. ३०) न्यायालयाने त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांनी दिली.
फिर्यादी अकेफ पठाण याला मजुरीतून साठवलेल्या पैशांतून रिक्षा घ्यायची होती. त्याने जा-नेवारी महिन्यात ओळखीचा आरोपी साजीद मणियार याची रिक्षा (एमएच २० डीसी २६७७) ९० हजार ने रुपयांना घेण्याचा सौदा केला होता. यासाठी त्याने दोन टप्प्यांत ७० हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून दिले होते. मात्र उर्वरित २० हजार रुपये वेळेवर न दिल्याने आरोपी साजीदने एप्रिल महिन्यात हा सौदा मोडला.
त्याने अकेफला २९ हजार रुपये परत केले आणि उरलेले ४१ हजार रुपये पंधरा दिवसांत देण्याचे कबूल , केले होते. त्यानंतर पैसे परत करण्यास टाळाटाळ , करणाऱ्या साजीदने २७ मे रोजी त्याची रिक्षा अकेफकडे गहाण म्हणून ठेवली होती.
पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून हल्ला
२८ मे रोजी साजीदने अकेफला फोन करून उर्वरित पैसे घेऊन जाण्यास आणि रिक्षा परत करण्यास सांगितले. त्यानुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास अकेफ कुरेशी पार्क येथे गेला असता साजीदने त्याला जवळच्या एका मोकळ्या मैदानावर नेले. तिथे त्याने अचानक कमरेला लावलेला कोयता काढून अकेफच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.
अकेफने हा वार हातावर झेलल्याने त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर साजीदने थेट अकेफच्या गळ्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अकेफने जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. या संधीचा फायदा घेत आरोपी साजीद त्याची रिक्षा घेऊन पसार झाला. अकेफने तात्काळ आपल्या भावाला आणि मेहुण्यांना कॉल करून बोलावून घेतले. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भरत पाचोळे करत आहेत.