Crime News: Headmaster ends his life by hanging himself at school
दौलताबाद, पुढारी वृत्तसेवा : दौलताबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.४) दुपारी उघडकीस आली.
नितीन मोहन कांबळे (४२, रा. माजी सैनिक कॉलनी, पडेगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे मृख्याध्यापकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कांबळे हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता ऑटो रिक्षाने दौलताबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आले होते. त्यांनी ऑटो रिक्षाचालक संदीप धायडे यांना दुपारी २ वाजता परत येण्यास सांगितले होते.
दुपारी दोनच्या सुमारास संदीप धायडे शाळेत आले असता शाळेच्या कार्यालयात कांबळे यांनी छतावरील पंख्याला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याची माहिती दौलताबाद पोलिस ठाण्याला दिली.
माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक संदीप वाघ, अशोक सोनवणे, अयुब पठाण, पोलिस अंमलदार मनोज राठोड व सुदर्शन राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने कांबळे यांना तात्काळ शासकीय घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले.
या घटनेची नोंद दौलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत.