Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : शिक्षण उपसंचालकांच्या दालनात अर्धनग्न होऊन स्टंटबाजी

परळीच्या शिक्षकांसह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या रमेश पाटीलवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Half-naked stunt in the hall of the Deputy Director of Education

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा न्याय मागण्याच्या नावाखाली भडकलगेट येथील विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या दालनात घुसून अधिकाऱ्यांसमोरच अंगावरील कपडे काढून स्टंटबाजी करत धिंगाणा घातल्याचा प्रकार मंगळवारी (दि.७) दुपारी घडला. परळी येथील अभिनव माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक सदाशिव आत्माराम भोसले, गणेश देविदास भोसले, अर्धनग्न होऊन व्हिडिओ व्हायरल करणारा रमेश पाटील (रा. गुलमंडी) आणि दोन अनोळखी अशी आरोपींची नावे आहे. या पाच जणांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यालयाच्या बाहेर ५२ वर्षीय महिला कर्मचारी सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी कर्तव्यावर होत्या. त्यावेळी बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील अभिनव विद्यालयाचे शिक्षक सदाशिव भोसले आणि गणेश भोसले हे त्यांच्या काही मागण्यांसाठी कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ता रमेश पाटील आणि अन्य दोन अनोळखी तरुण होते. त्यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ यांच्या केबिनमध्ये सुनावणी सुरू होती. त्यामुळे महिला कर्मचारी यांनी त्यांना 'साहेबांची सुनावणी सुरू आहे, थोडा वेळ थांबा', अशी विनंती केली. मात्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या रमेश पाटील याने महिला कर्मचाऱ्याशी हुज्जत घालत आरडाओरड सुरू केली व कार्यालयात दहशतीचे वातावरण निर्माण केले.

व्हिडिओ काढून कार्यालयाची बदनामी

रमेश पाटील हा आतमध्ये धिंगाणा घालत असताना त्याच्यासोबत आलेल्या पिवळा शर्ट घातलेल्या आणि लांब केस असलेल्या दोन तरुणांनी या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून शासकीय कार्यालयाची जाणीवपूर्वक बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र सांगळे करत आहेत. दरम्यान रमेश पाटील याला गुलमंडी येथील त्याच्या घरातून बुधवारी अटक केली. गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अंतर्वस्त्रावर उभे राहून अश्लील कृत्य

सुनावणी सुरू असतानाच या पाचही जणांनी जबरदस्तीने केबिनमध्ये प्रवेश केला. केबिनमध्ये अधिकारी-कर्मचारी उपस्थित असतानाच रमेश पाटील याने अचानक स्वतःच्या अंगावरील कपडे काढण्यास सुरुवात केली. त्याने अंडरवेअर सोडून अंगावरील सर्व कपडे काढून अधिकाऱ्यांसमोर अश्लील कृत्य केले. या अनपेक्षित आणि लज्जास्पद प्रकारामुळे महिला कर्मचाऱ्याला धक्का बसला आणि त्या घाबरून केबिनच्या बाहेर पळाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT