Crime News : ॲट्रॉसिटीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा FIle Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : ॲट्रॉसिटीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

पिसादेवी परिसरातील गट क्रमांक १३५ मधील गायरान जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडले होते.

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Accused Who Murdered Farmer Over Atrocity Dispute Sentenced to Life Imprisonment

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ॲट्रॉसिटीची केस मागे का घेत नाहीस, असे म्हणत शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून केलेल्या निघृण खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी मुख्य आरोपी शिवाजी महादू ऊर्फ माधवराव औताडे याला जन्मठेप आणि विविध कलमांखाली १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

पिसादेवी परिसरातील गट क्रमांक १३५ मधील गायरान जमिनीच्या वादातून हे हत्याकांड घडले होते. जनार्दन कोंडिबा कसारे (रा. साईनगर, पिसादेवी) आणि औताडे कुटुंबीयांमध्ये २००८ पासून जमीन व अॅट्रॉसिटी प्रकरणावरून वाद सुरू होता. त्यावेळी कसारे यांनी दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याची सुनावणी न्यायालयात सुरू होती. साक्षीपुरावे सुरू असल्याने आरोपींकडून केस मागे घेण्यासाठी दबाव आणला जात होता.

१८ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी जनार्दन कसारे हे पत्नी कलाबाई यांच्यासह शेतात काम करत होते. दुपारनंतर ते बैल जुंपण्यासाठी जात असताना आरोपी शिवाजी औताडे तेथे आला. त्याने जातीवाचक शिवीगाळ करत तुला खूप मस्ती आली का, असे म्हटले. कसारे यांनी, जे काही होईल ते कोर्टात होईल, असे सांगताच आरोपीने शर्टात लपवून आणलेल्या कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर मागून वार केला.

गंभीर जखमी झालेल्या कसारे यांना नातवाने खांद्यावर उचलून रिक्षापर्यंत आणले. घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात शिवाजी महादू औताडे याच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणात तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकिल अॅड. राजेंद्र मुगदिया यांनी युक्तिवाद केला. त्यांनी १५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात प्रत्यक्ष साक्षीदार, दोन पंच फितुर झाले तर मृताची पत्नी व नातू यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात आला. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून जन्मठेप व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक संजय धुमाळ आणि हवालदार सुनील बा. ढेरे यांनी काम पाहिले. अॅड. मुगदिया यांना अॅड. एस. व्ही. भुयागडे आणि अॅड. तेजल राठोड यांनी साह्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT