Crime News : हायकोर्टची सुरक्षा भेदून चोरी करणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : हायकोर्टची सुरक्षा भेदून चोरी करणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

तारेचे कुंपण वाकवून आत प्रवेश; एसीचे भंगार साहित्य लांबवले

पुढारी वृत्तसेवा

Crime Branch arrests two women who broke into High Court security and stole

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ परिसरातील कडेकोट सुरक्षा भेदून भिंतीचे तारेचे कुंपण वाकवून आत प्रवेश करत चोरी करणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर बेड्या ठोकल्या. आरोपी महिलांनी हायकोर्ट परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करून तेथील एसीचे भंगार साहित्य चोरून नेले होते. तब्बल ३७सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून गुन्हे शाखेने या चोरीचा छडा लावला आहे.

सुरेखा ऊर्फ भुरी अशोक मगरे (३३) आणि कल्पना लक्ष्मण हिवाळे (३२, दोघी रा. मिलिंदनगर, छोटा मुरलीधरनगर, उस्मानपुरा) अशी अटकेतील संशयित महिला आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

याप्रकरणी हायकोर्ट सुरक्षा विभागाच्या अरुणा गालत यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, ६ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन अनोळखी महिलांनी हायकोर्टाच्या पूर्वेकडील पार्किंग लगत, एन-४ कडे जाणाऱ्या रस्त्यावरील भिंतीचे तारेचे कुंपण वाकवून आत प्रवेश केला.

आवारात चोरी करताना पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडून नुकसान केले. त्यानंतर ८ ऑक्टोबरच्या रात्री या महिला पुन्हा चोरीच्या उद्देशाने हायकोर्टात शिरल्या. त्यांनी परिसरातील एसीचे पडलेले भंगार साहित्य गोळा करून ते चोरी करण्याच्या उद्देशाने कंपाऊंडच्या भिंतीवरून बाहेर रस्त्यावर फेकून दिले व लंपास केले. अतिसंवेदनशील असलेल्या हायकोर्ट खंडपीठ परिसरात चोरी झाल्याने गुन्हे शाखेने तातडीने समांतर तपास सुरू केला.

३७ कॅमेरे तपासले, भंगार विक्रेत्यांकडे चौकशी

पथकाने परिसरातील तब्बल ३७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. संशयित महिला उस्मानपुरा भागातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, या पद्धतीचे गुन्हे करणाऱ्या महिलांच्या अभिलेखाची पडताळणी केली. भंगार दुकानदारांकडे चौकशी केली असता, सुरेखा आणि कल्पना यांची नावे समोर आली.

दोघींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही महिला सराईत असून, यापूर्वीही दोघींवर जिन्सीत चोरीचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे) शशीकांत सातव, सहायक आयुक्त (गुन्हे) पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, अंमलदार योगेश नवसारे, प्रदीप दंडवते, विजय निकम, योगेश गुप्ता, राजेश यदमळ, राहुल बंगाळे, जालिंदर गोरे आणि पूनम पारधी यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT