Cracks in the wall of Tembhapuri dam; iron reinforcement bars exposed
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : टेंभापुरी मध्यम प्रकल्पाच्या मुख्य भिंतीला ठिकठिकाणी मोठे तडे गेल्याने, तसेच अनेक ठिकाणी काँक्रीट निखळून लोखंडी सळ्या उघड्या पडल्याने धरणाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धरणाच्या परिसरातील गावांना संभाव्य धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने या धरणाचे 'स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट' करावे, अशी मागणी शेतकरी कृती समितीने केली आहे.
याबाबत समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनकर्त्यांच्या मते, टेंभापुरी मध्यम प्रकल्पाची दुरुस्ती अवघ्या तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र, इतक्या कमी कालावधीतच मुख्य भिंतीची अवस्था बिकट झाल्याचे निदर्शनास आल्याने, करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या कामानंतरही धरणाच्या भिंतीला तडे जाणे आणि काँक्रीट निखळून सळ्या उघड्या पडणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचा आरोप शेतकरी कृती समितीने केला आहे. धरणाच्या मुख्य भिंतीवरील ठिकठिकाणचे तडे दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात धरणात पाणीसाठा वाढत असताना भिंतीच्या मजबुतीबाबत शंका उपस्थित होत असल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे शेतकरी कृती समितीचे म्हणणे आहे.
समितीने या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. धरणाच्या मुख्य भिंतीची तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत सखोल तपासणी करून त्याचे 'स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट' करण्यात यावे. तसेच, तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि संबंधित कामाची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दुरुस्तीच्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असेल किंवा कामाच्या गुणवत्तेबाबत हलगर्जीपणा झाला असेल, तर त्यास जबाबदार असलेल्या कंत्राटदार, संबंधित अधिकारी आणि इतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही समितीची मागणी आहे. दरम्यान, टेंभापुरी मध्यम प्रकल्प हा परिसरातील शेती आणि गावांसाठी। महत्त्वाचा त्याच्या असल्याने, सुरक्षिततेकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे.