Teacher Eligibility Test : शिक्षक पात्रता परीक्षेत मंगळसूत्रावरून वाद file photo
छत्रपती संभाजीनगर

Teacher Eligibility Test : शिक्षक पात्रता परीक्षेत मंगळसूत्रावरून वाद

केंद्रात प्रवेश देताना इतर दागिन्यांसह मंगळसूत्रही काढायला लावले, कुटुंबीयांकडून संताप व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

Controversy over mangalsutra in teacher eligibility test

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (सीटीईटी) रविवारी (दि.८) शहरातील काही परीक्षा केंद्रांवर मोठा वाद निर्माण झाला. विवाहित महिला उमेदवारांना केंद्रात प्रवेश देण्याआधी इतर दागिन्यांसोबतच चक्क मंगळसूत्रही काढून बाहेर ठेवण्यास सांगण्यात आले. त्यामुळे महिला उमेदवारांनी संताप व्यक्त केला. तर परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी नियमच तसा असल्याचे सांगत हात झटकले.

केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सीटीईटी शनिवार ७ व रविवार ८ फेब्रुवारी असे दोन दिवस घेण्यात आली. पहिल्या दिवशी शहरातील २८ केंद्रांवर सकाळपासून परीक्षार्थीनी गर्दी केली. दोन सत्रांत ही परीक्षा होत आहे. शनिवारी परीक्षा शांततेत पार पडली. त्यानंतर रविवारी सकाळी ९.३० ते १२ या वेळेत पहिला पेपर होता.

पेपरसाठीचे रिपोर्टिंग सात वाजता तर परीक्षा कक्षात ७.३० वाजेपासून सोडण्यात येत होते. त्यामुळे सकाळी केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाची तपासणी करून प्रवेश दिला जात होता. यावेळी अंगावरील दागिणे काढूनच आत प्रवेश देण्यात आला. काही विवाहित महिलांना त्यांचे मंगळसूत्रही काढण्यास सांगण्यात आले.

त्यामुळे महिलांनी आणि त्यांच्या सोबत आलेल्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी केंद्रातील कर्मचारी आणि महिला उमेदवारांमध्ये वादही झाला. परंतु नियमच तसे असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी दागिणे काढल्याशिवाय आत प्रवेश दिला जाणार नाही असे बजावले. त्यामुळे महिला उमेदवारांनी नाइलाजाने मंगळसूत्र काढून ठेवत आत प्रवेश केला.

रविवारी पहिल्या सत्रात ११ हजार ५२१ परीक्षार्थीनी दिली. तर १४९९ उमेदवार गैरहजर राहिले. दुसऱ्या सत्रात ८२८५ उमेदवार हजर होते. तर ८२९ उमेदवारांनी दांडी मारली.

परीक्षा हिंदुस्थानात की पाकिस्तानात ?

माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळसूत्र काढण्याच्या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. हिंदुत्व आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावे लागते. ११ वर्षांच्या सत्तेनंतरही प्रशासनाला मंगळसूत्र आणि कॉपी मधील फरक कळत नाही. ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही ? ही परीक्षा हिंदुस्थानात सुरू आहे की पाकिस्तानात, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT