Control point on Sambhajinagar-Beed-Dharashiv road
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-या सेवा : नवीन मंजूर झालेल्या छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव मार्गावर धावणारी रेल्वे कोणकोणत्या परिसरातून जाणार याची निश्चित माहितीसाठी चिन्हे रेखांकित म्हणजे कंट्रोल पॉइंट बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मार्गानिश्चिती होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
लीडार सर्व्हेमध्ये छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिवदरम्यान हैदराबाद येथील संस्थेने ठिकठिकाणी चिन्हे रेखांकित केलेली आहे. ही चिन्हे म्हणजे अलाइनमेंट नसून, त्यास कंट्रोल पॉइंट असे संबांधण्यात येत आहे. हा लोहमार्ग दक्षिण ते उत्तर भारत जोडण्याकरिता खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच जिल्ह्यातील शेंद्रा, बिडकीन, पैठण औद्योगिक विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
शहरात कोट्यवधीच्या औद्योगिक गुंतवणुकीची शक्यता लक्षात घेऊन या कामाला आणखीन वेगाने व्हावे यासाठी खा. डॉ. भागवत कराड प्रयत्न करत आहेत. सध्या धाराशिव, बीड, गेवराई, पैठण, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, चाळीसगाव या लोहमार्गाचा लीडर सर्व्हे नुकताच पूर्ण झालेला आहे. या संदर्भात नुकतीच जिल्ह्याधिकारी आणि रेल्वे अधिकारी यांची बैठक झाली असल्याची माहिती खा. डॉ. कराड यांनी दिली.
पिटलाईनच्या विद्युत तारांचे काम
येथील १६ डब्यांच्या पीटलाईनसाठी उभे करण्यात आलेल्या पोलवर विद्युत तारा जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत याचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसातच येथून बेंगलुरू, अहमदाबाद जोधपूर, वाराणसी, गोवा - तिरुअनंतपुरम तसेच नागपूर अशा गाड्या सुरू करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.