Chhatrapati Sambhajinagar Ganesh Procession Accident Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर हादरलं! भरधाव कंटेनर अचानक गणपती मिरवणुकीत घुसला; दोघांचा मृत्यू, 12 जखमी

Chhatrapati Sambhajinagar Ganesh Procession Accident: छत्रपती संभाजीनगरच्या पिंप्रीराजा गावाजवळ गणेशमूर्ती स्थापनेच्या मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला.

Rahul Shelke

Chhatrapati Sambhajinagar Ganesh Procession Accident: गणेशोत्सवाच्या उत्साहात सुरू असलेल्या मिरवणुकीला छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताने गालबोट लागले. चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावरील पिंप्रीराजा गावाजवळ गणपती मूर्तीच्या स्थापनेची मिरवणूक सुरू असताना भरधाव कंटेनर अचानक मिरवणुकीत घुसला. या दुर्घटनेत दोन गणेशभक्तांचा मृत्यू झाला असून सात वर्षांच्या मुलासह 12 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अचानक काळाचा घाला

पिंप्रीराजा गावात गणपती बाप्पाच्या आगमनामुळे उत्साहाचे वातावरण होते. ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मिरवणूक पुढे जात होती. गणेशमूर्ती स्थापनेची तयारी सुरू असतानाच अवघ्या काही अंतरावरून आलेल्या कंटेनरने मिरवणुकीत प्रवेश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळापासून सुमारे 100 मीटर अंतरावर कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनरने सलग तीन गतिरोधक ओलांडले. पुढे त्याने एका दुचाकीला धडक दिली आणि काही अंतरापर्यंत ती फरफटत नेली. या सर्व प्रकारामुळे मिरवणुकीत उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

काही क्षणांपूर्वी आनंदाने दुमदुमणारा परिसर अचानक मदतीच्या हाका, किंकाळ्या आणि आक्रोशाने हादरून गेला.

दोघांचा जागीच मृत्यू; 12 जण जखमी

या दुर्घटनेत विठ्ठल रामभाऊ जाधव (49) आणि रमेश लहूजी बनसोडे (45), दोघेही पिंप्रीराजा येथील रहिवासी, यांचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या 12 जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींवर जिल्हा रुग्णालय तसेच घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये एका सात वर्षांच्या मुलाचाही समावेश असून दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

संतप्त जमावाकडून कंटेनर चालकाला मारहाण

अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दुर्घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनर चालक किशोर घुले याला पकडून मारहाण केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत चालकाला ताब्यात घेतले.

कंटेनरचे ब्रेक निकामी झाले होते की चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला, याचा तपास कर्माड पोलीस करत आहेत. अपघाताची नेमकी कारणे तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.

‘गणपती बघून येतो’ म्हणत घराबाहेर पडले अन्...

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या रमेश बनसोडे यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. रमेश हे स्वतः ट्रकचालक होते. गणेशोत्सवासाठी ते आपल्या गावी आले होते. गावातील गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी ते घरातून बाहेर पडले होते.

मात्र, गणपतीचे दर्शन घेऊन परतण्याऐवजी त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रमेश यांच्या अकस्मात मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यांसमोर घडला थरार

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अपघाताचा प्रसंग अत्यंत भीषण असल्याचे सांगितले. गणेशमूर्ती खाली उतरवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अचानक कंटेनर मिरवणुकीच्या दिशेने आला. काही क्षणांतच त्याने नागरिकांना धडक दिल्याने मोठी दुर्घटना घडली.

गणेशोत्सवाच्या जल्लोषात सहभागी झालेल्या नागरिकांना काही कळण्याच्या आतच आप्तेष्ट गमावण्याची वेळ आली. या घटनेने संपूर्ण पिंप्रीराजा गावावर शोककळा पसरली असून उत्सवाचा आनंद क्षणात दुःखात बदलला आहे.

पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू असून कंटेनरची तांत्रिक तपासणी आणि चालकाची चौकशी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT