मराठवाड्यातील दळणवळण 'रिझर्व्ह' वर file photo
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यातील दळणवळण 'रिझर्व्ह' वर

मराठवाड्यात घरगु‌ती गॅस सिलिंडरपाठोपाठ आता पेट्रोल-डिझेलचीही टंचाई भासायला सुरुवात झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Connectivity in Marathwada Runs on 'Reserve'

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मराठवाड्यात घरगु‌ती गॅस सिलिंडरपाठोपाठ आता पेट्रोल-डिझेलचीही टंचाई भासायला सुरुवात झाली आहे. पुरवठा साखळीतील बिघाड आणि अफवांचे पेव यामुळे दोन दिवसांपासून पेट्रोल पंपांवर वाहनध-ारकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे गुरुवारी (दि.२६) शेकडो पेट्रोल पंपांवरील साठा संपून नो स्टॉकचे बोर्ड लागले. दरम्यान, खबरदारी म्हणून छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात प्रशासनाने दुचाकींमध्ये २०० रुपयांपर्यंत आणि चार चाकी वाहनांमध्ये २ हजार रुपयांपर्यंत इंधन भरण्याची मर्यादा घालून दिली आहे. परिणामी, संपूर्ण मराठवाड्यातील दळणवळण रिझर्व्हवर सुरू आहे.

आखाती देशातील युद्धाचा परिमाण देशाच्या इंधनाच्या पुरवठ्यावर होत आहे. मागील दहा दिवसांपासून सर्वत्र घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. तर व्यावसायिक गॅसधारकांचे सिलिंडर वितरण थांबविण्यात आलेले आहे. त्यातच दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्यावरही परिणाम दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवरील साठा संपून हे पंप कोरडे पडले. त्यामुळे दुपारनंतर निम्म्याहून अधिक पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागले. जिल्हा पुरवठा विभागाने खबरदारी म्हणून आता दुचाकींना २०० आणि चारचाकी गाड्यांमध्ये दोन हजार रुपयांपर्यंतच पेट्रोल-डिझेल देण्याचे आदेश पंप चालकांना दिले आहेत.

हिंगोलीत वाहनधारकांची उडाली धांदल

हिंगोलीत सोशल मीडियावर इंधन संपल्याची अफवा पसरल्यानंतर बुधवारी रात्री वाहनधारकांनी पेट्रोल-डिझेलसाठी पंपावर गर्दी केली होती. त्यामुळे गुरुवारी बहुतांश पेट्रोल पंपांवरील साठा संपला होता. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील पेट्रोल पंपांवर बुधवारी सायंकाळी वाहन चालकांनी रांगा लावल्या होत्या.

धाराशिव जिल्ह्यासाठीचा नियमित डिझेल, पेट्रोल पुरवठा होत असल्याने टंचाईची स्थिती नाही, त्यामुळे कोणत्याही पेट्रोल पंपांवर गर्दी नसल्याचे चित्र आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी सांगितले की, शहरातील तिन्ही पेट्रोलियम कंपन्यांच्या यंत्रणांसोबत बैठक झाली. त्यांच्याकडून पुरवठा साखळीचा आढावा घेण्यात आला. गॅसच्या बाबतीत मात्र ऑनलाईन बुकिंगचे प्रमाण वाढल्याने पुरवठ्यात आठ दिवसांचा फरक पडत आहे.

जालन्यात दोनशे रुपयांपर्यंतच पेट्रोल

जालन्यात दुद्दाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत, तर चारचाकी वाहनांसाठी २००० रुपयांपर्यंतच पेट्रोल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक पेट्रोल पंपांबर नो स्टॉकचे फलक झळकत असून, जिथे इंधन उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.

बीड शहरात गेल्या चार दिवसांपासून ठराविक पेट्रोल पंपांवरच पेट्रोल मिळत आहे. परिणामी त्या ठिकाणी वाहनधारकांची गर्दी वाढली आहे. गेवराईसह इतर काही शहरांमध्ये पेट्रोलसाठी रांगा पाहावयास मिळाल्या. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप असोसिएशनची बैठकही घेतली असून, पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या आहेत.

संभाजीनगरातील एक हजार ट्रक बाहेर

इंधन टंचाईचा मोठा फटका ट्रान्सपोर्ट व्यवसायीकांना बसला आहे. शहरातून विविध राज्यात साहित्य घेऊन गेलेल्या सुमारे एक हजार ट्रक गेल्या चार ते पाच दिवसांपासून तेथेच अडकून पडल्या आहेत. ईंधन टंचाईमुळे या व्यवसायांवर सुमारे २५ ते ३० टके विपरित परिणाम झाल्याची माहिती औरंगाबाद गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे फैय्याज खान यांनी दिली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर हे ट्रान्सपोर्ट व्यवसायांचे प्रमुख केंद्र आहे. येथून विविध राज्यात दररोज अडीच ते तीन हजार ट्रक विविध साहित्य घेऊन जातात. शहरातून गुजरात, पंजाब, तामिळनाडू, मध्यप्रदेश, केरळ, भीमापूर, सिलीगुडी, कलकत्ता, कर्नाटक, इम्फाळ व इतर राज्यांत गेलेल्या या ट्रक अडकून पडल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT