Complete the first phase of the new water supply scheme on time; instructions from the Secretary to the Chief Minister's Office
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने पुढाकार घेतला असून, सोमवारी (दि. २४) मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्वीनी भिडे यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा सविस्तर आढावा घेत या योजनेचा पहिला टप्पा नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबरअखेर पूर्ण करा, असे सक्त निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले आहेत. यापुढे थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडून योजनेच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल, असेही सांगण्यात आले. या योजनेसाठी आता निधीची कमतरता नाही, मग कामाला विलंब का, असा सवालही भिडे यांनी केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहराच्या भविष्यातील पाणी संकटावर उपाय म्हणून टाकण्यात आलेल्या बहुचर्चित नवीन पाणीपुरवठा योजनेच्या दोनशे एमएलडी पाण्याला नवीन वर्षातच मुहूर्त लागण्याची शक्यता असून, या योजनेच्या सध्याचा कामाचा मुंबईत सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे यांनी आढावा घेतला.
या बैठकीत प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी योजनेतील प्रलंबित कामांचा अहवाल सादर केला. निधीची कमतरता नाही, तरीही काही महत्त्वाची कामे धिम्या गतीने का सुरू आहेत, याबाबत भिडे यांनी थेट विचारणा केली. तसेच योजनेत विलंब होऊ नये, पुढील काळात मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियमितपणे प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असा स्पष्ट संदेश या बैठकीत देण्यात आला.
दरम्यान मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी शहराला डिसेंबर अखेर वाढीव २०० एमएलडी पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे डिसेंबर अखेर जायकवाडीहून शहरात पाणी आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे याबैठकीत सांगण्यात आले. दरम्यान, या बैठकीसंदर्भात अधिक माहिती देताना मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री यांनी डिसेंबर अखेरपर्यंत शहराला पाणी मिळेल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र डिसेंबर अखेरपर्यंत जायकवाडीपासून नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणणे खूप महत्त्वाचे असून, तेथून पुढे शहराला पाणी वाटप करणे हे खडतर ठरणार आहे
मग कामांना विलंब का ?
नवीन पाणीपुरवठा योजनेला आता निधीची कमतरता नाही, मग विलंब का होत आहे, अशी विचारणा करण्यात आली असून, योजनेचा पहिला टप्पा नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता पलांडे यांना बैठकीदरम्यान दिले.