Company driver dies after falling on iron plate after being pushed over minor dispute
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा :
किरकोळ वादातून ढकलून दिल्याने कंपनीसमोरील पार्किंग शेडच्या लोखंडी प्लेटवर पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री वाळूज येथील साहिल ऑटो टेक्नॉलॉजी कंपनीत घडली.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रमुनी साहेबराव कांबळे (रा. वडचुनी पोस्ट आडुळ, ता. औढा नागनाथ ह.मु. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव) असे मयताचे नाव असून तो गेल्या दोन वर्षांपासून रांजणगाव शिवारातील साहिल ऑटो टेक्नॉलॉजी कंपनीत चालक म्हणून कामाला होता. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास तो ड्युटी करून रांजणगाव येथील कृष्णनगरात राहणाऱ्या भावाला भेटला.
त्यानतंर तो अमोल खाडे, दीपक लहाने, लक्ष्मण ज्ञानेश्वर वाडेकर यांच्यासोबत दुचाकीवरून यूपी ढाब्यावर गेले होते. याठिकाणी थोडा वेळ थांबल्यानतंर चौघे रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास साहिल ऑटो कंपनीजवळ आले. यावेळी कंपनीसमोरील पार्किंगमध्ये किरकोळ कारणावरून लक्ष्मण वाढेकर याने चंद्रमुनी सोबत वाद घालत त्यास लोटलाट सुरू केली. दरम्यान अमोल व दीपक याने त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला, मात्र लक्ष्मण याने चंद्रमुनीला जोरात ढकलून दिल्याने तो पार्किंग शेडमधील लोखंडी प्लेटवर जाऊन पडल्याने बेशुद्ध पडला.
कंपनीच्या एच आर विभागाच्या सविता शिवशंकर, रवींद्र हिवाळे यांनी चंद्रमुनी यास सुरुवातीला बजाजनगरातील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र येथील डॉक्टरांनी अधिक उचारासाठी त्यास घाटी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला. चंद्रमुनी याला उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी चंद्रमुनी कांबळे यास तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी मयत चंद्रमुनी याचा भाऊ अमोल कांबळे यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी लक्ष्मण वाडेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.