Commissioner checks computers of absentees, asks employees for ID cards
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचे नवे आयुक्त अमोल येडगे यांनी पदभार घेतल्यानंतर शनिवार (दि.४) पासून कामाचा सपाटा सुरू केला आहे. रविवारी सुटीच्या दिवशी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आढावा घेतला. तर सोमवारी दुपारी अचानक सर्व विभागांना भेटी देत कामाची पाहणी केली. गैरहजर असेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संगणकाची तपासणीही केली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले होते.
या पाहणीदरम्यान आयुक्त येडगे यांनी विविध विभागांना भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली. विभागांमध्ये उपस्थित असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कामाबाबत माहिती जाणून घेतली. काही कर्मचारी ओळखपत्रांविना आढळून आले. त्यांना ओख-ळपत्र बाळगण्याचे आदेश दिले. तसेच अधिकारी व कर्मचारी दालनात अनुपस्थित होते, त्यांच्याबाबत इतर कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. याशिवाय त्यांच्या संगणकांवर सुरू असलेल्या कामांची पाहणी करून प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला.
या पाहणीनंतर आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले सध्या सर्वच विभागांतील कामाचा आढावा घेण्यात येत आहे. यंत्रणेतील भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आपण तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणार आहोत. भ्रष्टाचारावर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हाच पर्याय असू शकतो, असे अमोल येडगे म्हणाले.
उत्पन्न वाढविण्यासाठी नवे स्रोत उभारणार
लवकरच पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे या योजनेला मोठ्याप्रमाणात वीज पुरवठा लागणार असून, त्याचे बिलही जास्त येणार आहे. या खर्चासह योजनेसाठी काढलेल्या कर्जाच्या हप्त्यांचाही विचार करावा लागणार आहे. त्यामुळे अगामी वर्षात कर वसुली वाढविण्यासोबतच उत्पन्न वाढीचे नवे स्रोतही उभे करावे लागणार आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या प्रकल्प पूर्ण करून त्यातून लवकर उत्पन्न सुरू करण्यावर भर देणार आहे, असे आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.