सौंदर्याला विज्ञानाची जोड ! लेझर हेअर रिडक्शनचे वाढते महत्त्व : डॉ. आसावरी टाकळकर file photo
छत्रपती संभाजीनगर

सौंदर्याला विज्ञानाची जोड ! लेझर हेअर रिडक्शनचे वाढते महत्त्व : डॉ. आसावरी टाकळकर

व्रण, अनावश्यक डाग, रक्तवाहिन्यांचे विकार यांसारख्या समस्यांबरोबरच उपचार

पुढारी वृत्तसेवा

Combining Beauty with Science! The Growing Importance of Laser Hair Reduction: Dr. Asawari Takalkar

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आजच्या काळात त्वचेची निगा राखणे म्हणजे केवळ सौंदर्य जपणे राहिलेले नाही. व्यक्तिमत्त्व, स्वच्छता, आत्मविश्वास आणि जीवनशैली यांचाही तो एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

त्वचारोगशास्त्रात गेल्या काही वर्षांत लेझर तंत्रज्ञानामुळे मोठी प्रगती झाली आहे. पिगमेंटेशन, व्रण, अनावश्यक डाग, रक्तवाहिन्यांचे विकार यांसारख्या समस्यांबरोबरच अनावश्यक केसांवर उपचार करण्यासाठी लेझरचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामध्ये लेझर हेअर रिडक्शनला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. आसावरी टाकळकर यांनी सांगितले.

पूर्वी चेहरा, हात, पाय, अंडरआर्म्स किंवा शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी वॅक्सिंग, थ्रेडिंग, शेव्हिंग अशा पद्धतींचा वापर केला जात असे. या पद्धतींचा परिणाम तात्पुरता असतो. वारंवार कराव्या लागणाऱ्या या प्रक्रियांमुळे काही व्यक्तींना त्वचेची जळजळ, इनग्रोन हेअर, फॉलिक्युलायटिस, काळपटपणा किंवा त्वचेवर पुरळ येण्याचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी लेझर हेअर रिडक्शन हा अधिक दीर्घकालीन पर्याय ठरू शकतो. या उपचारामागचे विज्ञान समजून घेणे महत्त्वाचे आहे.

लेझरमधून विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश सोडला जातो. केसांमधील मेलॅनिन हे रंगद्रव्य हा प्रकाश शोषून घेते. त्यामुळे केसांच्या मुळाशी असलेल्या फॉलिकलमध्ये उष्णता निर्माण होते आणि केसांची वाढ करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. विशेषतः वाढीच्या सक्रिय अवस्थेतील केसांवर हा उपचार अधिक प्रभावी ठरतो. मात्र सर्व केस एकाच वेळी या अवस्थेत नसल्यामुळे अनेक सिटिंग्जची आवश्यकता असते.

साधारणपणे सहा ते आठ सिटिंग्जची गरज भासू शकते. उपचारांमधील अंतर साधारण चार ते सहा आठवडे असू शकते. मात्र हा आकडा प्रत्येकासाठी सारखा नसतो. केसांची जाडी, रंग, शरीरावरील उपचाराचे ठिकाण, हार्मोन्स आणि त्वचेचा प्रकार यांनुसार उपचारांचे नियोजन बदलते. प्रत्येक सिटिंगनंतर केसांची संख्या, जाडी आणि वाढण्याचा वेग कमी होत जातो. याला कायमस्वरूपी केसांचे निर्मूलन म्हणण्यापेक्षा दीर्घकालीन केसांची घट, म्हणजेच पर्मनंट हेअर रिडक्शन म्हणणे अधिक शास्त्रीय आहे. काही रुग्णांना परिणाम टिकवण्यासाठी अधूनमधून मेंटेनन्स सिटिंगची गरज लागू शकते.

त्वचेनुसार लेझर निवड व तपासणी

भारतीय त्वचेचा रंग तुलनेने अधिक गडद असल्यामुळे योग्य लेझर निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डायोड, अलेक्झांड्राइट आणि Nd: YAG यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेझर प्रणाली उपलब्ध आहेत. प्रत्येकाची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. रुग्णाच्या त्वचेचा रंग आणि केसांचा प्रकार तपासून योग्य तंत्रज्ञान व ऊर्जा निश्चित करावी लागते. केवळ महागडे मशीन म्हणजे चांगला उपचार असे समीकरण नाही. चेहऱ्यावर अनावश्यक केसांची वाढ अचानक वाढत असल्यास किंवा हनुवटी, वरचा ओठ याठिकाणी जास्त केस असल्यास हार्मोनल कारणे, विशेषतः पीसीओएस, तपासणे आवश्यक असते. अशा वेळी केवळ लेझर उपचार न करता मूळ कारणावरही उपचार करणे गरजेचे आहे.

सूचनांचे पालन महत्वाचे

लेझर उपचार सुरक्षित असले तरी ते योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाखालीच व्हायला हवेत. उपचारापूर्वी त्वचेची तपासणी, आवश्यकतेनुसार टेस्ट पॅच, योग्य सेटिंग्ज आणि उपचारादरम्यान डोळ्यांचे संरक्षण या गोष्टी अत्यावश्यक आहेत. उन्हामुळे टॅन झालेली त्वचा असल्यास उपचार पुढे ढकलावे लागू शकतात. उपचारानंतर सूर्यप्रकाशापासून संरक्षण आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन महत्त्वाचे आहे. आधुनिक लेझर तंत्रज्ञानाने अनावश्यक केसांची समस्या हाताळण्यासाठी प्रभावी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र प्रत्येक त्वचा वेगळी असते आणि प्रत्येक उपचाराचे नियोजनही वेगळे असते. त्यामुळे जाहिरातींना किंवा स्वस्त उपचारांच्या आमिषाला बळी न पडता, अनुभवी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे हाच सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT