छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ४७३ महाविद्यालयांपैकी केवळ ११५ महाविद्यालयांनीच नॅक मूल्यांकन करून घेतलेले आहे. उर्वरित महाविद्यालयांकडून नॅक मूल्यांकन करून घेण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे आता विद्यापीठ प्रशासनाने या महाविद्यालयांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. मे २०२५ अखेरपर्यंत नॅकला सामोरे न जाणाऱ्या महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता शून्य करण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरविले आहे.
उच्च शिक्षण संस्थांचा शैक्षणिक दर्जा हा त्यांच्या नॅक मूल्यांकनाच्या श्रेणीवरून ठरत असतो. त्यामुळे राज्यातील सर्व महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घ्यावे यासाठी उच्च शिक्षण विभाग गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. मागील तीस वर्षांपासून राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद (नॅक) हे मूल्यांकन करत आहे. अभ्यासक्रम, प्राध्यापकांची संख्या, विद्यार्थ्यांसाठीच्या प्राध्यापकांची संख्या, विद्यार्थ्यांसाठीच्या सोयीसुविधा, शैक्षणिक संस्थांत केले जाणारे संशोधन, संस्थेची आर्थिक स्थिती आदी बाबींची तपासणी करून संबंधित महाविद्यालय किंवा उच्च शिक्षण संस्थेला नॅकचे ए पासून सी पर्यंत ग्रेड दिले जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नुकतेच पुन्हा नॅक मूल्यांकन झाले. त्यात विद्यापीठाला ए प्लस ग्रेड मिळाला. मात्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, असे मूल्यांकन करून घेण्याकडे पाठ फिरवत आहेत. विद्यापीठाच्या शनिवारच्या अधिसभा बैठकीत डॉ. विक्रम खिल्लारे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर विद्यापीठ प्रशासनाने आपली भूमिका विशद केली आहे. त्यानुसार मे २०२५ अखेरपर्यंत नॅकला सामोरे न जाणाऱ्या महाविद्यालयांची प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता शून्य करण्यात येणार आहे.
विद्यापीठाशी संलग्नित ४७३ पैकी ११५ महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन पूर्ण झालेले आहे. तसेच एकूण ६७ महाविद्यालयांना प्रथम संलग्रनीकरण प्राप्त होऊन अद्याप पाच वर्षे पूर्ण न झाल्यामुळे ही महाविद्यालये नॅक मूल्यांकनासाठी पात्र नाहीत. नॅक पोर्टलवर ६८ महाविद्यालयांनी नोंदणी केलेली आहे. १३ महाविद्यालयांचा एसएसआर सबमिट असून १९ महाविद्यालये नॅक पीअर टीमच्या भेटीच्या प्रतीक्षेत आहेत.
आतापर्यंत विद्यापीठाने विविध महाविद्यालयांवर कारवाई केली आहे. त्याबद्दलची माहितीही प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलप्रित महाविद्यालयांपैकी नॅक मूल्यांकन, मानव संसाधन, मूलभूत व भौतिक सुविधा व इतर तत्सम निकांच्या अपूर्ततअभावी ४७३ संलग्नित महाविद्यालयांपैकी २८० महाविद्यालयांची प्रवेश क्षमता कमी करण्यात आली आहे. तसेच सदर ४७३ महाविद्यालयातील २३८६ अभ्यासक्रमांपैकी एकूण १०१८ अभ्यासक्रमांची संख्या कमी करण्यात आली असून एकूण ३७५ अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमता शून्य किंवा प्रवेश क्षमतेस स्थगिती देण्यात आलेली आहे, असे विद्यापीठाने लेखी उत्तरात म्हटले आहे.