Cloudburst rain in Palashi area
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पळशी परिसरात रविवारी (दि.५) रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसामुळे कापलेली मका, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतातील मकाची काही कणसे वाहून गेली, तर काही कणसे पाण्यात आहेत.
पाऊस शेतकऱ्यांची पाठ सोडत नसून ऐन मका, सोयाबीन पिके कापणीला आलेली असताना पावसाने लावून धरले आहे. तीन- चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मका, सोयाबीन कापणीच्या कामाला वेग आला होता. शेतकऱ्यांनी मका, सोयाबीनची कापणी केली व रविवारी रात्री पावसाने झोडपून काढले. यात मकाचा चारा ओला झाला. तर शेतात पाणी साचल्याने कणसं पाण्यात तरंगत आहे. सोयाबीन ओली झाल्याने कोंब फुटण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
सोमवारी सकाळी तलाठी निकाळे, पोलिस पाटील सुदाम जैवळ यांनी शिवारात फिरुन पाहणी केली. यावेळी सरपंच कोकिळाबाई रमेश बडक, उपसरपंच पंचफुलाबाई कैलास बडक, दत्ता बडक, भाऊसाहेब बडक, अरविंद बडक, नारायण बडक, काकासाहेब बडक, अंबादास पुंगळे, गजानन बडक, प्रकाश राजपूत, जगन्नाथ बडक, आदी शेतकरी उपस्थित होते.
पाऊस यावर्षी शेतकऱ्यांच्य पाचवीलाच पुजलेला आहे. उन्हाळ्याच्या मे महिन्यापासून पाऊस पडत असून आता तर पावसाने कहरच केला आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात रविवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पिकांची माती झाली आहे. पाऊस पाठ सोडत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.