छत्रपती संभाजीनगर : यंदा राज्यात सर्वत्र इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. याअंतर्गत ५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करून घेण्यात आली. शिक्षण विभागाने नोंदणीसाठी दिलेली मुदत संपली, मात्र अजूनही असंख्य विद्यार्थी नोंदणी करायचे राहून गेले आहेत. त्यामुळे आता अंतिम प्रवेश फेरीपर्यंत ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातील ९ हजार ५०० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये यंदा केंद्रीय पद्धतीने एकाच संकेतस्थळावरुन प्रवेश करण्यात येत आहे. या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता २१ लाखापेक्षा जास्त आहे. यासोबतच २५०० उच्च माध्यमिकचे वर्ग असणाऱ्या शाहा राज्य मंडळाव्यतिरिक्त अन्य मंडळाशी संबंधित, आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग, विमुक्त जाती व जमाती या विभागाच्या आणि सैनिका शाळा तसेच केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाद्वारे मान्यता प्राप्त शाखांमध्ये जवळपास ३ लाख प्रवेश क्षमता आहे. राज्यात यंदा दहावी उत्तीर्ण होणाऱ्या राज्य मंडळ संलग्न शाळांमधून १३ लाख ८७ हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
तसेच अन्य मंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये साधारण १ लाख ४० हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन्हींचा एकत्रित विचार करता एकूण १५ लाख २० हजार मुले साधारण इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झाली आहेत. दरवर्षी राज्यात साधारणत: १३ लाख मुले राज्य मंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होतात. तर अन्य मुले ही व्यवसाय शिक्षण, तंत्रशिक्षण, नर्सिंग अशा कोर्सेसला प्रवेश घेतात. यंदा राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी १२ लाख ७१ हजार मुलांनीच नोंदणी केली आहे.
त्यापैकी १२ लाख ५ हजार मुलांनी शंभर रुपये शुल्क भरुन त्यांच्या प्रवेशाचा एक भाग पूर्ण केला आहे. ऑनलाईन नोंदणीची शेवटची मुदत ५ जून होती. परंतु अजूनही असंख्य विद्यार्थी नोंदणी करायचे राहिले आहेत. म्हणून आता अकरावी प्रवेशाच्या अंतिम फेरीपर्यंत म्हणजे ४ नियमित फेरी व १ विशेष फेरी ओपन टू ऑल यामध्ये प्रत्येक फेरीच्या टप्प्यावर नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची मुभा शिक्षण विभागाने दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इयत्ता अकरावीची एकूण प्रवेश क्षमता ही ८१ हजार इतकी आहे. परंतु जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४८ हजार ८३५ विद्यार्थ्यांनीच प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील अकरावीच्या असंख्य जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
अकरावी प्रवेशासाठी नोंदणी करायची राहून गेलेल्या विद्यार्थ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. त्यांना नव्याने नोंदणी करण्याची संधी उपलब्ध आहे. शेवटच्या फेरीपर्यंत त्यांना नोंदणी करता येईल. परंतु विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा. जेणे करून त्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळू शकेल.- अश्विनी लाठकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक