Clash between two groups over an old dispute; 'Thar' vehicle rams into the crowd, pistol brandished to threaten
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांमध्ये सोमवारी (दि. २८) सायंकाळी 'फिल्मी' स्टाईलने हाणामारी व थरार उडाला. एका गटाने भरधाव थार गाडीने दुचाकीला धडक देत तरुणाला पिस्तुलची धमकी दिली, तर अवघ्या दहा मिनिटांतच दुसऱ्या गटाने काही अंतरावर हीच थार गाडी अडवून एकाला बेदम मारहाण करत गाडीच्या काचा फोडल्या. या राड्याप्रकरणी सिडको आणि एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिला प्रकारः 'थार'ने उडवले अन् पिस्तुलाचा धाक
एमआयडीसी सिडको हद्दीत घडलेल्या पहिल्या प्रकारात राहुल सुरेश हिवराळे (३१, रा. एन-८, सिडको) या तरुणाने फिर्याद दिली आहे. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहुल हा त्याचा मित्र किरण निकाळजे याच्यासोबत दुचाकीवरून जात होता. सिपेट कॉलेज हॉस्टेलच्या पुढे गजानन हॉटेल रोडवर पाठीमागून आलेल्या थार गाडीने (एमएच-२०-जीके-२९२२) त्यांना ओव्हरटेक करून जोराची धडक दिली.
खाली पडल्यानंतर थारने रिव्हर्स घेत त्यातील एकाने राहुलवर बियरची बाटली फेकून मारली. राहुलने पाहिले असता गाडीत गुंड अशोक मनोहर ऊर्फ टिक्या आदमने, त्याचा लहान भाऊ, मन्या आणि मुन्ना अन्सारी हे होते. यावेळी गाडीतील टिक्या आदमने आणि त्याच्या भावाने पिस्तुलाचा धाक दाखवत तू आता वाचला, पुढच्या वेळेस वाचणार नाही अशी धमकी दिली आणि पळ काढला. याप्रकरणी टिक्या आदमने व त्याच्या साथीदारांवर एमआयडीसी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरा प्रकार : टिक्या कुठेय? विचारत थार अडवून काचा फोडल्या
यानंतर अवघ्या दहा मिनिटांनी म्हणजेच सायंकाळी ५:४० वाजेच्या सुमारास याच थार गाडीची दुसऱ्या गटाने तोडफोड केली. याबाबत थार गाडी चालवणारा मनोज रामदास गांगवे (२३, रा. गौतमनगर) याने सिडको पोलिसांत तक्रार दिली आहे. मनोज हा त्याच्या मामाच्या मुलाची तीच थार गाडी (एमएच-२०-जीके-२९२२) दुरुस्तीसाठी शोरूमला घेऊन जात होता. तो मिसारवाडी चौकातून जात असताना राहुल हिवराळे, किरण ऊर्फ चिल्या निकाळजे, सोनू नवगिरे आणि धम्मा ढवळे (सर्व रा. फुलेनगर, आंबेडकरनगर) या चौघांनी दुचाकीवरून येऊन त्याची गाडी अडवली.
त्यांनी मनोजला गाडीतून खाली खेचून मारहाण केली आणि तुझा भाऊ टिक्या कोठे आहे? त्याला आम्ही जीवे मारणार आहोत अशी धमकी दिली. त्यानंतर संतप्त आरोपींनी थार गाडीच्या डाव्या बाजूची आणि पाठीमागची काच फोडून मोठे नुकसान केले. याप्रकरणी राहुल हिवराळे, किरण निकाळजे, सोनू नवगिरे व धम्मा ढवळे यांच्यावर सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.