Crime News : जाधववाडीत दोन गटांत कोयता-चाकूने हाणामारी file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : जाधववाडीत दोन गटांत कोयता-चाकूने हाणामारी

एका गटाने कोयत्याने डोकी फोडली, तर दुसऱ्याने चाकूने केले वार; हर्सल पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

Clash between two groups involving sickles and knives in Jadhavwadi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : हर्सल परिसरातील जाधववाडी आणि सिद्धेश्वर कॉलनी भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांत मध्यरात्री जबर राडा झाला. एका गटाने तो मुलगा कुठे आहे अशी विचारणा करत थेट कोयत्याने वार करून तिघांची डोकी फोडली. तर याच राड्यात दुसऱ्या गटाने तरुणावर चाकूने वार केले. याप्रकरणी हर्सल पोलिस ठाण्यात दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार आरोपीना बुधवारी (दि.२३) रात्री उशिरा अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली.

पहिला प्रकार : तो मुलगा कुठेय म्हणत कोयत्याने वार पहिल्या घटनेत, दिनेश रमेश पाटील (३०, रा. गल्ली नं. १, सिद्धेश्वर कॉलनी) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोमवारी (दि. २१) रात्री साडेअकराच्या सुमारास दिनेश पाटील हे त्यांच्या गल्लीतील देवेश बोडखे, समर्थ बोडखे, यशकुमार बोडखे आणि गौरव फुके यांच्यासोबत घरासमोर गप्पा मारत बसले होते.

त्यावेळी प्रविण थोरात, पवन तवार, दिनेश पवार, दिपक मालोदे, किरण थोरात आणि अमोल पवार (सर्व रा. जाधववाडी, सुरेवाडी) हे तेथे आले. तो मुलगा कुठे लपवून ठेवलाय, त्याला बाहेर काढा असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. याच वेळी प्रवीण थोरातने दिनेश पाटील यांच्या डोक्यात आणि हाताच्या बोटावर कोयत्याने वार केले, तसेच त्याने समर्थ बोडखे याच्याही डोक्यात कोयता मारला.

तर दिनेश पवार याने यशकुमार बोडखे याच्याही डोक्यात कोयत्याने मारून जखमी केले. हल्लेखोरांनी गल्लीतील दुचाकी खाली ढकलून नुकसान केले. जखमींच्या डोक्याला टाके पडले आहेत. याप्रकरणी हसूल पोलिसांत ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा प्रकारः घरी बोलावून घेत चाकूहल्ला

या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच (रात्री पावणेबारा वाजता) दुसरी घटना घडली. याप्रकरणी संदेश देविदास वानखेडे (२५, रा. जाधववाडी) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मित्र पवन तवार (पहिल्या गुन्ह्यातील आरोपी) आणि गोट्या राम बोडखे यांच्यात जुने भांडण होते. याच कारणावरून गोट्याने संदेशला आपल्या घरी बोलावून घेतले.

संदेश घरी येताच, याला कशाला बोलावले असे म्हणत गोट्याच्या आईने संदेशच्या डाव्या खांद्याजवळ चाकू मारला. त्यानंतर गोट्याने आईच्या हातातील चाकू हिसकावून घेत संदेशच्या पाठीवर डाव्या बाजूला वार केले, तर वडील राम बोडखे यानेही त्याला बेदम मारहाण केली. तू मला ओळखले नाही का? अशी धमकी गोट्याने दिली. याप्रकरणी गोट्या राम बोडखे (१९), राम बोडखे (४०), गोट्याची आई (३८) आणि एका अज्ञात मित्राविरुद्ध हर्सल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT