Chhatrapati Sambhajinagar Crime pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कारवर हल्ला करणारे तिघे अखेर गजाआड

दारूच्या नशेत कबुली; सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील न्यायालयीन कामकाज आटोपून शहरात परतलेल्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या (सीजेएम) शासकीय वाहनाला अडवून चालकाच्या तोंडावर कड्याने मारहाण रक्तबंबाळ करत कारची हातोडीने तोडफोड करणाऱ्या तिघांच्या वेदांतनगर पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. तीन दिवस तपास करून घरातूनच तिघांना उचलले. हा सर्व प्रकार दारूच्या नशेत घडल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली आहे.

गौरव ऊर्फ बंटी राजू पैठणी (२६, रा. इंदिरानगर), सुरेश अण्णासाहेब गुटाळ (२७, रा. बनेवाडी, मूळ ता. सेलू) आणि विनोद सुभाष तायडे (३७, रा. कर्णपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे यांनी दिली. तिघेही बांधकाम मजूर आहेत.

या गंभीर घटनेनंतर अटकेच्या भीतीने तिन्ही आरोपी पसार झाले होते. मात्र, वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निसार शेख, हेड कॉन्स्टेबल बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, प्रवीण मुळे, तौफिक अत्तर आणि आशिष राठोड यांच्या पथकाने वेगाने तपासाला दिशा दिली. पोलिसांनी घटनास्थळ आणि पळून गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये कैद झालेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि थेट घरातूनच त्यांच्या मुसक्या आवळल्या.

काय घडले होते मंगळवारी ?

मंगळवारी (दि. २९) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी, वरिष्ठ लिपिक आणि शिपाई साहेबराव पाटील हे पैठण येथे शासकीय काम आटोपून जिल्हा न्यायालयाचे चालक शेख इकबाल शेख इब्राहिम यांच्यासोबत शासकीय कारने परतत होते. विट्स हॉटेल चौकात कारसमोर आरोपीने मोपेड आडवी घातली. कारचालक इकबाल यांनी त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता, आरोपीने शिवीगाळ करत चालकाच्या तोंडावर हातातील लोखंडी कड्याने मारून रक्तबंबाळ केले. त्यानंतर दुसऱ्या दुचाकीवरील आरोपीने तिचे येऊन हातोडीने कारच्या दरवाजावर मारून तोडफोड केली. गोंधळ पाहून लोक जमले तेव्हा आरोपीना कारवर मुख्य न्यायदंडाधिकारी अशी पाटी दिसताच त्यांनी थेट अयोध्या मैदानाकडे पळ काढला होता. याप्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT