City's water supply to increase by 26 MLD from July
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरासाठी टाकण्यात आलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून जुलै महिन्यापासून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्णत्वाकडे आले असून, जूनअखेर हे ते संपणार आहे. त्यामुळे या जलवाहिनीतून सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यात २६ एमएलडीची वाढ होणार आहे. त्यासोबतच पाण्याचा गॅप पाच दिवसांआडहून कमी होणार असल्याचे असे संकेत प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले.
शहरासाठी २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाले असून, एमबीआर, जलशुद्धीकरण केंद्र, शुद्ध पाणीप-रवठा केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. जायकवाडी येथे जॅकवेलच्या कामाला गती देण्यात आली आहे.
जॅकवेलमधून पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी जॅकवेलचे ३ हजार चौरस फूट क्षेत्राचे काम पूर्ण करून त्यावर प्री-इंजिनिअरिंगच्या साह्याने विद्युत पंप बसविण्यात येणार आहे. ऑक्टोबर अखरेपर्यंत २०० एमएलडी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनी काम करीत आहे.
शहरातील अंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामाला गती देण्यात आली असून, ज्या जलकुंभाचे काम ५० टक्क्यापेक्षा अधिक झाले, ते पूर्ण प्राधान्याने पूर्ण करून घेण्यात येत आहे. त्यापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्यासाठी महापालिकेने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहे.
त्यासाठी नवीन ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रशासनाने फारोळ्यातील नवीन जलशुद्धीकरण केंद्राच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, जूनअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे जुलैपासून शहराला ९०० तून पूर्ण क्षमतेने पाणी मिळणार असून, शहराचा पाणीपुरवठा २६ एमएलडीने वाढणार आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम ऑक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या टप्प्यातून शहराला किमान २०० एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे शहराच्या अनेक वसाहतींना टप्प्याटप्प्याने मुबलक पाणी मिळण्यास सुरुवात होणार आहे, असे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.