छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

नक्षत्रवाडीजवळ फुटली बाराशेची पाईपलाईन : दुरुस्तीला लागणार १२ तास

पुढारी वृत्तसेवा

City's water supply disrupted

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाची असलेली १२१९ मिमी व्यासाची (बाराशेची) जलवाहिनी रविवारी (दि.२) दुपारी नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसमध्ये अचानक फुटल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाईपलाईन फुटल्याने सुमारे ५० एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली असून, दुरुस्तीस किमान १२ तास लागणार असल्याने अनेक भागांत कमी दाबाने तसेच उशिराने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे अलीकडेच शहरातील पाणीस्थितीत सुधारणा झाली होती. या योजनेतून दररोज सुमारे १०० एमएलडी पाणी उपलब्ध होत असून, बाराशेच्या जलवाहिनीतून आणखी ५० एमएलडी पाण्याची भर पडत होती. त्यामुळे शहरातील अनेक भागांत पाण्याचा दाब वाढला होता. मात्र, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास नक्षत्रवाडी पंपहाऊसमध्ये जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.

काही काळ परिसरात पाण्याचे लोट मोठ्याप्रमाणात वाहू लागल्याने एकच गोंधळ उडाला. याबाबतची माहिती मिळताच महापालिकेचे अभियंते आशिष वाणी, सुभाष लहाळे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जलवाहिनीतील पाण्याचा पूर्ण निचरा झाल्यानंतरच दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. त्यामुळे दुरुस्तीस किमान १२ तासांचा कालावधी लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच बाराशेच्या जलवाहिनीतून होणारा पुरवठा बंद झाल्याने सध्या शहराला नव्या योजनेतून ८० एमएलडी आणि २०० मिमी जलवाहिनीतून ७० एमएलडी, असे मिळून १५० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी समन्वय साधून अतिरिक्त १० ते १५ एमएलडी पाणी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान सोमवारी (दि.३) सकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

५० एमएलडी पाण्याची तूट

बाराशेची जलवाहिनी बंद फुटल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात सुमारे ५० एमएलडीची घट झाली आहे. सध्या नवीन योजनेतून ८० एमएलडी आणि ९०० मिमी जलवाहिनीतून ७० एमएलडी, असे एकूण १५० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. अतिरिक्त १० ते १५ एमएलडी पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी समन्वय सुरू आहे.

नागरिकांना संयमाचे आवाहन

जलवाहिनीतील पाण्याचा पूर्ण निचरा झाल्यानंतरच दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याने किमान १२ तास लागणार आहेत. त्यामुळे अनेक भागांत पाणी कमी दाबाने किंवा उशिराने मिळू शकते. पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT