City residents will receive an abundant water supply within two months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराला येत्या दोन महिन्यांत नवीन २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी (दि.१९) गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडी धरणातून नव्याने तयार केलेल्या जॅकवेलमध्ये पाणी घेण्यास सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्याने पुढील चार दिवसांत ३७०० अश्वशक्तीचा एक पंप सुरू करून जॅकवेलमधून जलवाहिनीच्या फ्लशिंगसाठी पाण्याचा उपसा सुरू केला जाणार आहे.
यावेळी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह महापालिकेचे शहर अभियंता ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता वसंत भोये, एमजेपीचे कार्यकारी अभियंता तुषार टेकावडे, योजनेचे तज्ज्ञ अधिकारी एम. बी. काझी, कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगलोथू, खलील खान यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
शहरवासियांना २००५ सालापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यावेळचे महापौर किशनचंद तनवाणी यांच्या कार्यकाळात पहिल्यांदा समांतर जलवाहिनीचा विषय सभागृहात चर्चेला आला. तेव्हापासून नव्या जलवाहिनीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून, २०१६ साली मंत्री अतुल सावे यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला, यातून शहराला राज्याकडून १६८० कोटींची योजना मंजूर झाली.
मात्र त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कामाचा शुभारंभ तर झाला, मात्र त्यानंतर वर्षभर योजनेचे काम बंद राहिले. त्यामुळे खर्च वाढल्याने योजना अडचणीत आली होती. केंद्रातील मोदी सरकारने अमृत २ मधून वाढीव खर्चाला मंजुरी देत योजना २७४० कोटी रुपये निधी उपलब्ध कून घेतले. मंत्री सावे यांच्या पाठपुराव्यामुळे आता या जलवाहिनीतून येत्या एक ते दीड महिन्यातच मुबलक पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.
एमजेपीचा खडा पहारा
जॅकवेलमध्ये पाणी घेताना थोडीही चूक होऊ नये, यासाठी पहाटेपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह जीव्हीपीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगलोथू, खलील खान यांनी पहाटेपर्यंत कामगारांच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवत खडा पहारा दिला.
जीव्हीपीआरचा पहिला टप्पा यशस्वी
शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीला कामाची मंद गती आणि कमी मनुष्यबळ यावरून सतत प्रशासन आणि न्यायालयाकडून फटकारले गेले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेवर लक्ष केंद्रित केले. सततच्या आढाव्यामुळे कामाची गती वाढली अन् वर्षभरात कंपनीने जॅकवेलसह पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण केली. अवघ्या १२ महिन्यांत पहिला टप्पा पूर्ण करून जॅकवेलमध्ये यशस्वीरीत्या पाणी आणले.
दोन महिन्यांत पाण्याची चिंता मिटेल नवीन पाणीपुरवठा योजनेतून जायकवाडी धरणात उभारलेल्या जॅकवेलमध्ये गुरुवारी पाडव्याच्या मुहूर्तावर पाणी घेण्यास सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा यशस्वी झाल्याने आता पुढील दोन महिन्यांत शहराला मुबलक पाणीपुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे आता शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सतत या योजनेच्या कामाचा आढावा घेतल्यामुळेच कामाला गती मिळाली.- अतुल सावे, मंत्री, गृहनिर्माण विभाग