Gas supply through pipeline : नोव्हेंबरअखेर शहरवासीयांना पाईपलाईनद्वारे मिळणार गॅस  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Gas supply through pipeline : नोव्हेंबरअखेर शहरवासीयांना पाईपलाईनद्वारे मिळणार गॅस

खा.डॉ. कराड यांचा दावा, पहिल्या टप्प्यात १० हजार घरांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

City residents will get gas through pipeline by the end of November

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान टाकण्यात येणाऱ्या घरगुती गॅस पाईपलाईनचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच या पाईपलाईनमधून गॅसची चाचणी देखील घेण्यात आली आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर अखेर शहरातील १० हजार घरांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे, असा दावा माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. भागवत कराड यांनी केला.

मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही पाईपलाईनद्वारे घरपोच स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी या पाईपलाईनचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारत पेट्रोलियमद्वारे या कामाला सुरुवात करण्यात आली होती.

आंध्रप्रदेशहून गुजरातकडे जाणाऱ्या गॅस पाईपलाईनला श्रीगोंदा येथे जोडणी करून तेथून पाईपलाईनद्वारे हा गॅस छत्रपती संभाजीनगर शहरात आणला जाणार आहे. त्यासाठी श्रीगोंदा ते छत्रपती संभाजीनगर अशी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. या लाईनचे काम काही दिवसांपासून नगरच्या इमामपूर घाटात शेतकऱ्यांच्या विरोधामुळे काम रखडले होते. हा विरोध मावळल्यानंतर काम वेगात पूर्ण करण्यात आले. दरम्यान गॅस वितरणाबाबत आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये पाईपलाईनद्वारे शहरावासीयांना गॅसचे विरतण केले जाणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

३७ हजार कनेक्शन पूर्ण

भारत पेट्रोलियमने शहरातील प्रभाग ७ व ९ मधील वॉर्डामध्ये गॅस पाईपलाईन टाकून घराघरत कनेक्शन देण्याचे काम पूर्ण केले आहे. येथील सुमारे २२ हजार घरांमध्ये कनेक्शन देण्यात आले आहेत. तसेच प्रभाग ४ आणि ५ मधील वॉर्डामध्ये गॅस लाईनचे काम सुरू आतापर्यंत संपूर्ण शहरात ३७हजार कनेक्शन पूर्ण झाले आहेत.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून नागरिक पाईपलाईनव्दारे मिळणाऱ्या गॅसची वाट पाहत आहेत. ती प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे.

सिलिंडर बाजूला ठेवावे लागेल

पाईपलाईनद्वारे शहरापर्यंत गॅस पोहचला आहे. त्याबाबतची चाचणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे नोव्हेंबर अखेरपासून शहरवासीयांना पाईपद्वारे गॅस पुरवठा होणार असल्याने सिलिंडर बाजूला ठेवावे लागणार आहेत, असा दावा खासदार डॉ. कराड यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT