missing cases Pudhari
छत्रपती संभाजीनगर

चिंताजनक ! शहरातून गेल्या तीन महिन्यांत 468 जण बेपत्ता

महिलांचे प्रमाण सर्वाधिक; २४७ जणांचा शोध; अद्याप २२१ जणांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगर : शहरात आणि जिल्ह्यातून बेपत्ता होणाऱ्या नागरिकांचे, विशेषतः महिलांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. चालू वर्षातील (२०२६) जानेवारी ते मार्च या केवळ तीन महिन्यांतच शहरातून तब्बल ४६८ जण घरातून बेपत्ता झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, गेल्या तीन महिन्यांत तब्बल २६६ महिला बेपत्ता झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.

विशेष मोहीम राबवून शोध घेतला जातो प्रत्येक सहायक आयुक्तांकडे मिसिंग सेल स्वतंत्रपणे कार्यरत असून, त्यासाठी एक अधिकारी, कर्मचारी नियुक्त आहे. ऑपरेशन मुस्कान, ऑपरेशन शोध अशा विविध विशेष मोहीम आम्ही राबवत असतो. गतवर्षी या मोहिमेत १२ जणांचा शोध लागला होता. सातत्याने मिसिंग आणि अपहरणबाबत आढावा घेतला जातो. हरवलेल्या व्यक्तीचा माग काढण्यासाठी सीसीटीव्हीची चांगली मदत होत आहे.
- रत्नाकर नवले, पोलीस उपायुक्त (गुन्हे)

५० टक्क्यांहून अधिक नागरिकांना शोधण्यात पोलिसांना यश

घरातून रागाच्या भरात किंवा अन्य कारणांनी निघून गेलेल्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके आणि एएचटीयू विभाग सातत्याने कार्यरत असतो. पोलिसांच्या तत्परतेमुळे गेल्या तीन महिन्यांत बेपत्ता झालेल्या ४६८ पैकी २४७ जणांचा (१०७ पुरुष, १३४ महिला आणि ६ इतर) सुखरूप शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र अद्यापही २२१ व्यक्ती (८९ पुरुष आणि १३२ महिला) बेपत्ता असून, त्यांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. या व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान आहे. शहरातून गेल्या तीन महिन्यात ३० अल्पवयीन मुले आणि ४६ मुलींचे अपहरण झाल्याची नोंद विविध ठाण्यांमध्ये झाली. त्यातील २५ मुले आणि ३४ मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. तत्पूर्वी २०२१ पासून यंदाच्या जानेवारीपर्यंत ७ मुले आणि ५९ मुली सापडलेल्या नव्हत्या. त्यानुसार मार्चअखेर न सापडलेल्या मुला-मुलींचा एकंदरीत आकडा १२ मुले आणि ७१ मुली असा आहे.

मार्च महिन्यात आकडा सर्वाधिक

पोलीस दलाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये १५० जण, फेब्रुवारीत १३४ जण तर मार्च महिन्यात सर्वाधिक १८४ जण बेपत्ता झाले आहेत. एकूण ४६८ बेपत्ता व्यक्तींमध्ये १९६ पुरुष, तर २६६ महिला आणि ६ बालकांसह इतरांचा समावेश आहे. वाढत्या शहरीकरणासोबतच हरवणाऱ्या व्यक्तींची ही वाढती आकडेवारी पोलीस प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.

घरातून निघून जाण्याची प्रमुख कारणे

  1. कौटुंबिक कलह: पती-पत्नीतील वाद, सासू-सुनेचे भांडण किंवा घरातील इतर सदस्यांसोबत होणाऱ्या क्षुल्लक वादातून घराचा त्याग करण्याचे प्रमाण मोठे आहे.

  2. प्रेम प्रकरण आणि आमिष: अल्पवयीन मुली आणि तरुण महिलांच्या बेपत्ता होण्यामागे प्रेम प्रकरण, लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणे हे मोठे कारण आहे.

  3. मोबाईल आणि पालकांच्या रागवण्याने: हल्ली मोबाईलच्या अतिवापरावरून किंवा अभ्यासावरून पालकांनी रागवल्यास अल्पवयीन मुले-मुली टोकाचे पाऊल उचलून घर सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

  4. आर्थिक विवंचना आणि बेरोजगारी: नोकरीचा शोध किंवा डोक्यावर कर्ज झाल्यामुळे नैराश्यातून पुरुषांनी घर सोडून निघून जाण्याचे प्रकारही वाढले आहेत.

  5. मानसिक आजार: काही प्रकरणांमध्ये मानसिक आजार किंवा स्मरणशक्ती गेल्यामुळे वयोवृद्ध व्यक्ती रस्ता चुकून बेपत्ता होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT