Citizens' response to Gunthewari increased from Satara-Devalai
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सातारा-देवळाईतील ज्या नागरिकांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेऊन घरांची बांधकामे केली, त्यांना महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी गुंठेवारीत शुल्क सवलत दिली आहे. त्यामुळे आता गुंठेवारीसाठी लागणारा ३ लाखांचा खर्च ४० हजारांवर आला असून, या सवलतीचा लाभ घेत अनेकांनी गुंठेवारीचे प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे अडीच हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी प्रस्ताव तयार केले आहेत, अशी माहिती गुंठेवारी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष रवींद्र पिंगळीकर यांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाच्या सूचनेनुसार प्रशासनाने सातारा-देवळाई या दोन वॉर्डातील सुमारे १० ते १५ हजार मालमत्ताधारकांना गुंठेवारीच्या शुल्क सवलतीचा विशेष लाभ दिला आहे. या लाभासाठी मागील अनेक वर्षांपासून सातारा देवळाईतील गुंठेवारी विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी आंदोलन करीत होते. त्यांच्या या आंदोलनाला दिवाळीपूर्वीच यश आले आहे. गेल्यावर्षी विधानसभा, लोकसभा निवडणुकीतही या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला निवेदन सादर केले होते.
ग्रामपंचायतीची परवानगी असलेल्यांना गुंठेवारीची सक्ती नको, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली होती. मात्र त्यावेळी ही मागणी मंजूर न झाल्याने सातारा-देवळाईतील नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. परंतु महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ऐन दिवाळीची भेट महापालिकेने नागरिकांना दिली आहे.
यामुळे दिवाळीपासून सातारा-देवळाईतील मालमत्ताधारकांनी सवलतीचा लाभघेत मालमत्ता नियमित करून घेण्यास सुरुवात केली आहे. मागील दहा दिवसांत अनेकांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. तर सुमारे अडीच हजारांहून अधिक जणांनी प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
वास्तुविशारदचे भरमसाठ शुल्क गुंठेवारी करण्यासाठी वास्तुविशारद यांच्याकडून प्रस्ताव तयार करून घ्यावा लागतो. हा प्रस्ताव तयार करण्यासाठी वास्तुविशारद एका प्रस्तावासाठी सुमारे १५ हजार रुपये घेतात. प्रशासक जी. श्रीकांत यांनी सातारा-देवळाईकरांसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमार्फत प्रस्ताव तयार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे ५ हजार रुपयांतच प्रस्ताव तयार करून मिळेल, असे गुंठेवारी विर-येथील ोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष रवींद्र पिंगळीकर यांनी सांगितले.