Citizens oppose Padegaon garbage depot
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नारेगाव येथील कचरा डेपो बंद करून महापालिकेने पडेगाव, हसूल, चिकलठाणा या तीन ठिकाणी कचरा डेपो तयार केले. मात्र, यातील पडेगाव कचरा डेपो हा नागरी वसाहतीपासून केवळ २०० मीटर अंतरावरच आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वात भावसिंगपुरावासीयांनी ३ वर्षे कडाडून विरोध करीत पाठपुरावा केला. त्यात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत येथील शेकडो नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारींचा पाऊस पाडला.
शहरातील पडेगाव कचरा डेपो हा नागरिकांसाठी सर्वाधिक नुकसानदायक ठरत आहे. एवढेच नव्हे तर या डेपोमुळे भागवसिंगपुर्यातील सुमारे १० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या त्रासाला कंटाळून मागील तीन वर्षांत येथील सुमारे ५०० हून अधिक लोकांनी आपली घरे, फ्लॅट कवडीमोल भावात विक्री करून निघून गेले आहेत.
महापालिका प्रशासनाच्या दंडेलशाहीमुळे ही मरणयातना सध्या १५ वसाहतींतील नागरिक सहन करीत आहेत. या कचरा डेपोविरोधात सर्वात पहिले आंदोलन शिवसेना ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख गणेश लोखंडे यांनी केले होते.
यात शेकडो नागरिकांनी रास्ता रोको करीत पडेगाव डेपोकडे कचऱ्या नेण्यास विरोध दर्शविला होता. या आंदोलनानंतर लोखंडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी या डेपोविरोधात सतत आंदोलन केले. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील सतत निवेदन देऊन कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली. आता या डेपोमध्ये सायंटीफीक लैंडफिल केले जाणार आहे.
त्यामुळे दुर्गंधीसोबतच आता भूजलही विषारी केले जाणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांना काही महिन्यांतच काळ्यापाण्याची शिक्षा सहन करावी लागेल. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण समितीच्या सुनावणीत शिवसेनेकडून लोखंडे व अमोल थोरे यांच्यासह अनेकांनी तक्रारी दाखल केल्या.
पडेगाव कचरा डेपो त्वरित बंद करा, नसता या कचरा डेपोविरोधात वेळप्रसंगी आम्ही स्वतःचे रक्त सांडवू, अशा तीव्र प्रतिक्रिया शिवसेना पदाधिकाऱ्यांसह वॉर्डातील नागरिकांनी दिल्या. यात लक्ष्मीकांत पगारे, अमोल थोरे, महेश मदन, विशाल लोखंडे, आदित्य लोखंडे, किशोर सातपुते यांचा समावेश आहे.