Citizens attack toddy shop in Mondha Naka area
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक ताडीच्या नावाखाली घातक रसायने आणि नशेच्या 'बटन' गोळ्यांची सर्रास विक्री होत असल्याच्या संशयावरून संतप्त नागरिकांनी मोंढा नाका-लक्ष्मण चावडी परिसरातील शासनमान्य ताडीच्या दुकानावर थेट हल्लाबोल करत तोडफोड केली.
सोमवारी (दि. २७ जुलै) सायंकाळी हा उग्र प्रकार घडला. विशेष म्हणजे, तपासणीसाठी आलेल्या जिन्सी पोलिसांच्या एका अंमलदाराने दुकानातील ड्रममध्ये हात टाकताच त्यांच्या हाताची तीव्र आग झाल्याने या घातक रसायन असल्याचा संशय बळावला आहे. परिसरातील मजूर, रिक्षाचालक आणि रोजंदारीवर काम करणारे कामगार या दुकानातून नियमितपणे ताडी पीत होते.
मात्र, ही ताडी प्यायल्यानंतर अनेक जण तासनतास बेशुद्ध पडल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिला आणि नागरिकांनी एकत्र येत या दुकानावर हल्ला चढवला. नागरिकांच्या हल्ल्याची माहिती मिळताच जिन्सी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांची कागदपत्रे तपासली असता दुकान 'शासनमान्य' असल्याचे समोर आले. मात्र, प्रत्यक्ष पाहणीवेळी जिन्सी पोलिस ठाण्याच्या एका अंमलदाराने संशयास्पद द्रव असलेल्या एका ड्रममध्ये तपासणीसाठी हात घातला. काही क्षणांतच त्यांच्या हाताची तीव्र आग होऊ लागली. यावरून त्या रसायनाची तीव्रता आणि भयानकता स्पष्ट झाली. माणसांना पिण्यासाठी रसायन दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
ताडीचे नमुने फॉरेन्सिक
लॅबकडेराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी आणि जिन्सी पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक सीलबंद बाटल्या आणि ड्रममधील द्रव्याचे नमुने जप्त केले आहेत. हे नमुने सखोल रासायनिक आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच या विषारी रसायनाचे खरे स्वरूप उघड होईल आणि त्यानुसार संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
रासायनिक द्रव्यात, 'बटन' गोळ्या ?
या दुकानात नैसर्गिकरित्या आंबवलेली ताडी विकण्याऐवजी, पाण्यात पांढरे घातक रासायनिक द्रव्य आणि नशेच्या 'बटन' गोळ्या विरघळवून हे विषारी पेय तयार केले जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ग्राहकांना जास्त नशा यावी यासाठी हा प्रयोग केला जात असून, यामुळे आतड्यांवर घातक रासायनिक क्रिया घडून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.