CIDCO-HUDCO water supply delayed again by two days
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा फटका बसला असून, एमजीएम रुग्णालयासमोरील ४०० मिमी व्यासाच्या मुख्य एक्सप्रेस जलवाहिनीला सोमवारी (दि. १५) सकाळी गळती लागल्याने सिडको परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. गळती दुरुस्त करण्यासाठी दिवसभर जलवाहिनी बंद ठेवावी लागल्याने मरीमाता व एन-५ येथील जलकुंभांमधून होणारा पुरवठा थांबविण्यात आल्याने सिडको-हडको परिसरातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सिडको-हडको परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या ४०० मिमी व्यासाच्या मुख्य एक्सप्रेस जलवाहिनीला एमजीएम रुग्णालयासमोर सोमवारी सकाळी गळती लागली. त्यावरून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून जलवाहिनीपर्यंत पोहोचत दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र गळतीचे स्वरूप गंभीर असल्याने काम अपेक्षेपेक्षा अधिक वेळ चालले.
अखेर रात्री सुमारे नऊ वाजेच्या सुमारास दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. दुरुस्तीच्या काळात मुख्य जलवाहिनीतील पाणीप्रवाह पूर्णपणे बंद ठेवावा लागला. त्यामुळे एन-५, एन-६, एन-७ तसेच आसपासच्या अनेक भागांतील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले. यापूर्वी नुकतेच काही तांत्रिक कारणांमुळे सिडको आणि हडको भागाचा पाण्याचा टप्पा एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर आता नव्या गळतीमुळे आणखी एका दिवसाने पाण्याचा टप्पा पुढे ढकल्यात आल्याने नागरिकांचा प्रतीक्षाकाळ वाढला आहे.
वारंवारच्या गळतीने वाढवली चिंता
शहरातील प्रमुख जलवाहिन्यांमध्ये वारंवार गळती आणि तांत्रिक बिघाड होत असल्याने पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रत्येक वेळी दुरुस्तीसाठी पुरवठा बंद ठेवावा लागत असल्याने हजारो नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. पाण्याची टंचाई अद्याप पूर्णपणे कमी झालेली नसताना अशा घटनामुळे वितरण व्यवस्था अधिकच विस्कळीत होत आहे. त्यामुळे जुन्या जलवाहिन्यांची नियमित तपासणी, वेळेवर देखभाल आणि दीर्घकालीन नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अनेक वसाहतींना दोन दिवस उशिराने पाणी
मुख्य एक्सप्रेस जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले. त्यामुळे मंगळवारपासून पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत. मात्र विस्कळीत झालेले वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याने अनेक वसाहतींना दोन दिवस उशिराने पाणी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.