छत्रपती संभाजीनगर : दोन दशकांहून अधिक काळ पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या सिडको-हडको परिसराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला अखेर बळ मिळाले आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली असून, टीव्ही सेंटर, हरसिद्धी आणि सिडको एन-५ येथील जलकुंभांमध्ये शुक्रवार (दि.२८) पासून या जलवाहिनीतून पाणी घेण्यास सुरुवात झाली. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठ्याचा गॅप एक दिवसाने कमी होणार आहे.
सिडको-हडको भागाला आतापर्यंत १११८ मिलिमीटर व्यासाच्या एक्स्प्रेस जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जात होता. तसेच सिडको एन-५ येथील जलकुंभात येणारे पाणी पंपिंगद्वारे सिडको एन-७ आणि हरसिद्धी येथील जलकुंभात सोडले जात होते. मात्र नवीन पाणी योजनेतील १५०० मिलिमीटर जलवाहिनी मागील पंधरा दिवसांपासून चाचणीच्या टप्प्यात होती. तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाणी घेण्यास सुरुवात झाली.
या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि सिडको हडको परिसरातील नगरसेवकांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत नवीन जलवाहिनीतून पाणी घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठ्याचा कालावधी सुधारण्यास मदत होणार असून, या जलवाहिनीतून पाणी मिळण्याच नागरिकांची अनेक दिवसांची प्रतीक्ष संपुष्टात आली आहे.
पाण्याचा अपव्यय, १० हजारांचा दणका
पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. पाणी रस्त्यावर सोडणे, वाहने धुणे, तसेच घरे आणि रस्ते धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मागील आठवड्यात पैठण गेट परिसरात पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकाला १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे सिडको-हडकोसह संपूर्ण शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी भरल्यानंतर नळ तातडीने बंद करावा, पाणी रस्त्यावर सोडू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात गढूळ पाणी येण्याची शक्यता
सिडको - हडको भागासाठीच्या नवीन जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाली असली तरी सुरुवातीच्या काही दिवसांत नळातून गढूळ पाणी येण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र खबरदारी म्हणून पाणी उकळून अथवा निर्जंतुकीकरणाचे औषध टाकून प्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.