जे.ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर : सिडको बसस्थानक परिसरात विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक सोयी सुविधा असणारे बसपोर्ट उभारण्याचे काम पर्यावरण विभागाच्या एनओसीमुळे रखडले होते. ती एनओसी नुकतीच प्राप्त झाली असून, येत्या आठ दिवसांत बांधकाम परवानगी मिळणार आहे.
बसपोर्टच्या प्रत्यक्ष कामाला जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती एसटीचे कार्यकारी अभियंता गणेश राजगिरे यांनी दिली. बसपोर्टसच्या कामाचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले. भूमिपूजनानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी तब्बल ७ वर्षां प्रतीक्षा करावी लागली. आता ही प्रतीक्षा संपली असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरुवात होणार आहे.
बांधकाम परवानगीसाठी प्रस्ताव मनपाकडे देण्यात आला असून बांधकाम परवानगी येत्या आठ दिवसांत मिळणार असल्याचीही माहिती राजगिरे यांनी दिली. पर्यावरण विभागाच्या एनओसाठी तब्बल एक वर्षापेक्षाही जास्त काळ प्रतीक्षा करावी लागली. नुकतेच ही एनओसी ठेकेदाराला प्राप्त झाली आहे. त्यामुळे बांधकामांतील मोठा अडसर दूर झाला आहे.
मे अखेर पाडापाडी
दरम्यान मे अखेर सिडको बसस्थानक पूर्णपणे पाडण्यात येणार असून हे बसस्थानक मुकुंदवाडी येथील मुख्य कार्यशाळेत हलवण्यात येणार आहे. यापूर्वी बसस्थानकांतील अनेक कामे मध्यवर्ती कार्यशाळेतून करण्यात येत आहेत. आता लवकरच येथून विविध मार्गावर जाणाऱ्या बसेसही मध्यवर्ती कार्यशाळेच्या परिसरातून प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.
सात वर्षांची प्रतीक्षा
सिडको बसस्थानक परिसरात विमानतळांच्या धर्तीवर सर्व सोयी सुविधायुक्त बसपोर्ट उभारण्याच्या जागेचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले.
भूमिपूजनानंतर दोन वर्षांत हे अत्याधुनिक असे बसपोर्ट प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होते. दरम्यान बसपोर्टसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर महत्त्वाची असलेली पर्यावरण विभागाची एनओसी भेटल्यानंतर हा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी तब्बल सात वर्ष प्रतीक्षा करावी लागली.
बारामतीत दीड वर्षात उभारले बसपोर्ट
बारामतीतील राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती प्रचंड असल्याने त्या ठिकाणी २ मार्च-२०२३ रोजी बसपोर्टच्या कामाला सुरुवात केली आणि केवळ दीड वर्षात ते पूर्णही करण्यात आले. तेथील राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती आणि त्यांचा रेटा हे कारणीभूत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंत्र्यांचा भडिमार असूनही या कामांसाठी सात वर्ष वाट पाहावी लागली.