अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे चार बालविवाह रोखले file photo
छत्रपती संभाजीनगर

Child marriage : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे चार बालविवाह रोखले

सावंगी बायपासवर होणारा विवाह दामिनी पथकाने थांबविला

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शहरासह ग््राामीण भागात होणारे चार बालविवाह रोखण्यात पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला मोठे यश आले आहे. शनिवारी (दि. 18) तीन तर रविवारी (दि. 19) एक असे एकूण चार बालविवाह थांबवण्यात आले.

विशेष म्हणजे रविवारी (दि.19) सावंगी बायपास भागात सुमारे दीड ते दोन हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत सुरू असलेला विवाह दामिनी पथकाने अत्यंत शांततेत व कौशल्याने थांबवला. करमाड भागातील जळगाव फेरण, जटवाडा रोड, आंबेडकर नगर आणि सावंगी बायपास येथे या कारवाया करण्यात आल्या.

अक्षय तृतीयेला बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त असल्याने, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विविध पथके स्थापन पूर्वतयारी करण्यात आली होती.

रोखण्यात आलेल्या चारही प्रकरणांत कायदेशीर कार्यवाही करत, कुटुंबांचे समुपदेशन करून हे विवाह थांबविण्यात आले. दरम्यान, रविवारी (दि. 19) सावंगी बायपास, केंबिज चौकाजवळील रोज फंक्शन हॉलमध्ये बालविवाह होत असल्याची माहिती दामिनी पथक प्रमुख उपनिरीक्षक कांचन मिरधे यांना मिळाली.

दामिनी पथक आणि महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट विवाहस्थळ गाठले. यावेळी नवरदेव आणि नवरी वेशभूषेत होते आणि दीड ते दोन हजार वऱ्हाडी मंडळींची गर्दी होती. दोन्ही कुटुंबांना बालविवाहाचे कायदेशीर आणि शारीरिक दुष्परिणाम समजावून सांगितले.

स्थानिक नगरसेवक काकडे व इतर नागरिकांनीही मध्यस्थी करत प्रशासनाला सहकार्य केले आणि हा विवाह शांततेत थांबवण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या पालकांना महिला व बाल विकास समितीसमोर मुलीचे वयाचे पुरावे घेऊन हजर राहण्याची नोटीस देण्यात आली.

नवरी अवघ्या 16 वर्षांची

अधिकारी नितेश धुर्वे यांनी तत्काळ मुलीच्या वयाची शहानिशा करण्यासाठी आधार कार्ड आणि रामनगर येथील शाळेचा जन्माचा दाखला तपासला. यात नवरी मुलगी (रा. मुकुंदवाडी) अवघी 16 वर्षे 4 महिन्यांची अल्पवयीन असल्याचे, तर नवरदेव (रा. फुलेनगर, हर्सूल) 23 वर्षांचा असल्याचे निष्पन्न झाले.

वर्षभरात 61 बालविवाह रोखले

जिल्ह्यात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत 61 बालविवाह रोखण्यात आले. छत्रपती संभाजीनगर-25, पैठण व गंगापूर प्रत्येकी 8, वैजापूर-3, कन्नड, सोयगाव व खुलताबाद प्रत्येकी 2, फुलंबी-4, सिल्लोड-7 असे एकूण 61 बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र दराडे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT