Sambhajinagar News : छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाला ३.४८ कोटींचा निव्वळ नफा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाला ३.४८ कोटींचा निव्वळ नफा

ऊसउत्पादकांना प्रतिटन ३ हजारांचा भाव : भागधारकांना ६ टक्के लाभांश, संस्थापक अध्यक्ष बागडे यांची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajiraje Sugar Industry posts a net profit of ₹3.48 crore

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : साखर उद्योगासमोरील विविध अडचणी आणि आव्हानांवर मात करीत दीनदयाळनगर येथील छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाने २०२५-२६ या गाळप हंगामात ३ कोटी ४८ लाख २८ हजार रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिमेट्रिक टन ३ हजार रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भागधारकांना ६ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी (दि. २२) कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना केली.

छत्रपती संभाजीराजे साखर उद्योगाची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी कारखाना परिसरात झाली. या सभेत मागील आर्थिक वर्षातील कामगिरीचा आढावा घेण्यात आला. साखर उद्योगातील आव्हानात्मक परिस्थितीतही कारखान्याने नफ्याची नोंद केल्याचे बागडे यांनी सांगितले.

त्याचा लाभ ऊस उत्पादक आणि भागधारकांना देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. गत गाळप हंगामात कारखान्याने ३ लाख ३० हजार ८०४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून १०.५६ टक्के साखर उतारा मिळाला. कारखान्याने एकूण ३ लाख ३५ हजार ९८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर यंदासाठीही कारखान्याने मोठे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

आगामी हंगामात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहण्याची शक्यता असल्याने उसाच्या उपलब्धतेवर आणि गाळपावर परिणाम होण्याची शक्यता व्यवस्थापनाने व्यक्त केली. तरीही आगामी हंगामात ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ऊस उपलब्धता आणि गाळप नियोजनावर भर दिला जाणार आहे.

दरम्यान, वार्षिक सर्वसाधारण सभेत नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, रामचंद्र भोगले आणि प्रल्हाद पन्हाळे यांच्या संचालकपदावरील नियुक्तीस मंजुरी देण्यात आली. या सभेला संचालक देवजीभाई पटेल, विवेक देशपांडे, बळीराम उकर्डे, प्रकाश काकडे, राधाकिसन पठाडे, व्यवस्थापक दिगंबर बडदे, मुख्य लेखाधिकारी शिवाजी टकले, उपाध्यक्ष दामोदर नवपुते, सजनराव मते, रामराव शेळके, भागचंद ठोंबरे, संतोष गावंडे, कचरू जाधव, शहादेव बागडे, रुद्र झिंजुर्डे यांच्यासह सभासद उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT