महानगरपालिकेतील नामधारी ठेकेदारांच्या अडचणी वाढल्या  File Photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar |महानगरपालिकेतील नामधारी ठेकेदारांच्या अडचणी वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर: महापालिकेत ठेकेदारी करणाऱ्यांची संख्या हजारावर गेली आहे. यात मोठ्याप्रमाणात माजी नगरसेवकांच्या मर्जीतील नामधारी ठेकेदारांचा समावेश असून त्यांनीच मालमत्ता कर थकविला आहे. मात्र महापालिका प्रशासकांनी कर थकविणाऱ्या ठेकेदारांना विकासकामांचे कंत्राट देऊ नये, असे आदेश देताच नामधारी अडचणीत आले आहेत.

अनेक जण थकीत कराचे हप्ते पाडून घेण्यासाठी झोन कार्यालयांच्या खेट्या मारत आहेत. महापालिकेत नगरसेवक म्हणून आलेला प्रत्येक जण आपापल्या वॉर्डातील विकासकामांसाठी प्रयत्न करीत असतात. विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून घेण्यापासून तर ते काम आपल्याच मर्जीतील ठेकेदाराला कसे मिळवून देता येईल, येथपर्यंतची सर्व कामे त्या त्या वॉर्डातील नगरसेवक करीत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. यासाठी नगरसेवक आपल्या जवळच्याच कार्यकर्त्याला ठेकेदारीचे काम देतात. तर काही जण नातेवाइकांनाच ठेकेदार म्हणून नियुक्त करतात. याच नामधारी ठेकेदारांकडे महापालिकेचा कर थकला आहे. प्रशासकांनी गेल्या आठवड्यातच ठेकेदारांना नवीन काम देण्यापूर्वी त्यांच्याकडून कर भरणा केल्याबाबत नाहरकत पत्र (एनओसी) घ्यावे, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी का छत्रपती संभाजीनगर शहरातील मनपाच्या सर्व कार्यालयांमध्ये सुरू आहे. कर थकविणाऱ्या ठेकेदारांना नवे काम देण्यापूर्वी त्यांच्याकडून एनओसी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे नामधारी ठेकेदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. या ठेकेदांरांची संख्या शंभरहून अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काहींना नव्या कामांच्या निविदा भरता येईना तर काहींचे कार्यारंभ आदेश आणि काहींची बिले रोखण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांनी वॉर्ड कार्यालयात जाऊन कर भरण्यास सुरुवात केली आहे. तर काही जण थकीत कराचे हप्ते करून घेण्यासाठी खेट्या मारत असल्याचे दिसून आले.

८० टक्के तरी कर भरा

थकीत ठेकेदार महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये खेट्या मारत आहेत. परंतु त्यांना कर भरणा केल्यावरच निविदा भरता येईल, असे सांगण्यात येत आहे. किमान ८० टक्के तरी कर भरणा करावाच लागेल, असेही वॉर्ड कार्यालयांमधून सांगण्यात येत आहे. काहींनी हजारो रुपयांचा कर थकवला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT