छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समुपदेशन प्रक्रियेतून वर्ग ४ मधील तब्बल ३२ कर्मचाऱ्यांना वर्ग ३ पदांवर पदोन्नती मिळाली. मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ही कारवाई वेळेत पूर्ण करण्यात आली.
१५ सप्टेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने वेरूळ सभागृहात मंगळवारी (दि. १६) सीईओ अंकित व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राघवेंद्र घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन पार पडले. उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता व रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार करण्यात आली. या प्रक्रियेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामपंचायत अधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्यक अशा गट ड मधील २० पदांसाठी उमेदवार पात्र ठरले. यामुळे कर्मचाऱ्यांच्या दिवंगत वारसांना आर्थिक दिलासा व उपजीविकेचा आधार मिळणार आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने बाबदाऱ्या पार पाडाव्यात, असे आवाहन यावेळी सीईओ अंकित यांनी केले. या प्रक्रियेत सहाय्यक प्रशासन अधिकारी मीना तपकिरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी दिलीप निकम, चंद्रशेखर करंडे, निलेश जाधव, दिनकर आहेवाड आदींनी परिश्रम घेतले.