Chhatrapati Sambhajinagar Liquor Ban Protest
छत्रपती संभाजीनगर : सातही जन्मी हाच पती मिळू दे म्हणत सोमवारी (दि.२९) वटपौर्णिमेच्या दिवशी शहरात विविध ठिकाणी महिला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून प्रदक्षिणा घालत होत्या. पण त्याच वेळी एक महिला दारू बंदी करावी, या मागणीसाठी क्रांती चौकात वडाच्या झाडाला चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्या बांधून पूजा करत असल्याचे चित्र दिसून आले.
हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमल्याने तब्बल अर्धा तास या भागातील वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर मात्र पोलिसांनी वडाचे झाड, दारूच्या रिकाम्या बाटल्या व महिलेला ताब्यात घेतले.
शहरभर वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. हाच पती जन्मोजन्मी मिळू दे, अशा आणाभाका घेत असताना मात्र एका महिलेने सोमवारी दुपारी क्रांती चौकात दारू बंदी करावी, या मागणीसाठी अनोखे आंदोलन केले. त्या महिलेने चक्क वडाचे झाड विकत आणून त्याला देशीसह विविध ब्रँडच्या दारूच्या रिकाम्या बाटल्या बांधून त्याची पूजा केली. ही अनोखी पूजा पाहण्यासाठी दोन्ही बाजूंनी मोठी गर्दी वाढली. यामुळे क्रांती चौकात तब्बल अर्धा तास वाहतूक खाेळंबली होती. या अनोख्या आंदेालनाची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
क्रांती चौकात सुरू असलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांचीही चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी महिलेची समजूत काढण्याचे प्रयत्न केले, मात्र महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर पोलिसांनी महिलेसह वडाचे झाड, रिकाम्या दारूच्या बाटल्या तसेच पूजेसाठी आणलेले साहित्य ताब्यात घेतले.