ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेतील साहेबांच्या जाचाला कंटाळून महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट जीवन संपवत असल्याचे स्टेटस ठेवल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली.  
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar | एलसीबीतील साहेबांचा जाच; महिला पोलिसाचे जीवन संपवण्याबद्दलचे स्टेट्स

ग्रामीण पोलिस दलात खळबळ; महिला कर्मचारी सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) साहेबांच्या जाचाला कंटाळून एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट जीवन संपवत असल्याचे स्टेटस ठेवल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली. सोमवारी (दि. १३) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दिवसभर या महिला कर्मचाऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर दुपारी खुलताबाद भागात ती सुखरूप असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या धक्कादायक प्रकारामुळे एलसीबीमधील अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संबंधित महिला पोलिस कर्मचारी अतिशय तणावाखाली आहे. चिकलठाणा येथून बदली होऊन त्या आठ महिन्यापूर्वी एलसीबीत आल्या होत्या. त्यांच्याकडे हजेरी मेजरचे काम होते. मात्र, कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यावरून त्यांचे साहेबांसोबत नेहमी खटके उडू लागले. साहेबानी त्यांचे काम काढून घेतल्याने तणाव आणखी वाढला. एक दिवस साहेबांना उभे राहून सॅल्यूट न ठोकल्याने तुमचे पाय मोडले काय? असे सर्वांसमोर बोलून अपमानित केले होते. त्यामुळे घालून पाडून आणि आक्षेपार्य बोलत असल्याने, वैतागून त्या थेट सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, त्यावेळी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने तक्रार अर्ज मागे घेतला होता. मात्र, त्यानंतरही त्या साहेबांनी तिचा जाच सुरूच ठेवल्याचे या नव्या प्रकारावरून उघड झाले आहे.

चिकलठाण्यातही त्रास, तक्रार बेदखल याच महिला पोलिस कर्मचारी यापूर्वी चिकलठाणा पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. तेव्हा त्यांनी सोबतच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध पोलिस निरीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला होता. मात्र, तत्कालीन अधिकाऱ्याने तिची तक्रार बेदखल केल्याने त्या सर्व ठिकाणी होणाऱ्या जाचामुळे तणावात होत्या असे सूत्रांनी स्पष्ट केले.

कामाच्या मूल्यमापनातही डावल्याची भावना

प्रभारी अधिकारी (पोलीस निरीक्षक) यांच्या शिफारशीनुसार हवालदार व इतर कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालावर रिमार्क देत असतात. पोलिस अधीक्षक पडताळणी नंतर अंतिम रिमार्क देतात. या प्रक्रियेतही या महिला कर्मचाऱ्याला मनाजोगा रिमार्क मिळाला नाही. त्यामुळे त्या तणावात होत्या, अशीही चर्चा आहे.

स्टेट्समध्ये काय म्हटले ?

महिला पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तिने लिहिले आहे की, पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या त्रासामुळे माझे प्रचंड मानसिक खच्चीकरण झाले आहे. माझी कोणतीही चूक नसताना मला जाणीवपूर्वक त्रास देऊन, अधिकाराचा गैरवापर करून मला आत्महत्येस प्रवृत्त केलेले आहे. या शब्दांमध्ये त्या महिला पोलिसाने आपली आपबिती जगजाहीर केली.

चौकशी केली जाईल ती महिला कर्मचारी सुखरूप आहे. तिचे समुपदेशन करण्यात आले आहे. यापूर्वी तिची काही तक्रार होती त्याअनुषंगाने आणि आता तिचे जे काही म्हणणे असेल त्यासंबंधी अर्ज घेऊन सखोल चौकशी केली जाईल. त्यानंतर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. विनयकुमार राठोड, पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT